|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » बहुप्रतीक्षित सॅमसंग गॅलक्सी एस8 दाखल

बहुप्रतीक्षित सॅमसंग गॅलक्सी एस8 दाखल 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सॅमसंग कंपनीने बहुप्रतीक्षित असणारे गॅलक्सी एस8 आणि गॅलक्सी एस8 प्लस  हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल केले. 5 मेपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. बुधवारपासून याची पूर्वनोंदणी सुरू झाली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन निवडक दुकांनात, फ्लिपकार्ट आणि सॅमसंग इंडियाच्या ई-स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध असतील.

गॅलक्सी प्रकारातील एस7 या स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट होत असल्याने अनेक तक्रारी आल्यानंतर दक्षिण कोरियन कंपनीने जगभरातील मॉडेल्स मागे घेतले होते. त्यामुळे कंपनीला फटका बसला होता. दोन्ही नवीन स्मार्टफोन डय़ुअल सिम प्रकारात उपलब्ध आहेत. सॅमसंग कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या ईक्सिनोस 8895 प्रोसेसरचा वापर करण्यात आला. डिस्प्लेसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 5 संरक्षणाचा वापर करण्यात आला असून बेझललेस स्क्रीन आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 12 मेगाफिक्सलचा डय़ुअल पिक्सल रिअर कॅमेरा असून सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. स्टोरेज क्षमता 64 जीबी असून मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने 256 जीबीपर्यंत वाढविता येईल.

मेटल बॉडीच्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगची सोय आहे. याव्यतिरिक्त 4जी एलटीई, ब्लुटुथ व्ही5.0, यूएसबी टाईप-सी, एनएफसी, सॅमसंग पे, एमएसटी, बिक्सि व्हर्च्युअल असिस्टंट, आयरिस स्कॅनर, फिंगरप्रिन्ट स्कॅनर आणि फेसियल रेकग्निशन या सुविधा आहेत. मिडनाईट ब्लॅक, ऑर्चिड ग्रे, आर्टिक सिल्व्हर, कोरल ब्लू, मेपल गोल्ड या रंगात हे स्मार्टफोन उपलब्ध होतील. दमदार फिचर्स असणाऱया स्मार्टफोनची किंमतही मोठी आहे. भारतात गॅलक्सी एस8 ची किंमत 57,900 रुपये आणि गॅलक्सी एस8 प्लस 64,900 रुपयांत खरेदी करता येईल.

वैशिष्टये        सॅमसंग गॅलक्सी एस8           सॅमसंग गॅलक्सी एस8 प्लस

डिस्प्ले          5.80 इंच                           6.20 इंच

प्रोसेसर        ईक्सिनोस 8895                 ईक्सिनोस 8895

ऑपरेटिंग प्रणाली                                  ऍन्ड्रॉईड 7.0         ऍन्ड्रॉईड 7.0

रिअर कॅमेरा  12 मेगापिक्सल                  12 मेगापिक्सल

सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सल                    8 मेगापिक्सल

स्टोरेज/रॅम    64 जीबी/4 जीबी                64 जीबी/4 जीबी

वजन           155 गॅम                            173 ग्रॅम

बॅटरी           3000 एमएएच                   3500 एमएएच

किंमत 57,900 रुपये      64,900 रुपये