|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नाम फौंडेशनव्दारे टेंभुच्या पोटकालव्यांना गती

नाम फौंडेशनव्दारे टेंभुच्या पोटकालव्यांना गती 

प्रतिनिधी/ आटपाडी

आटपाडी तालुक्यात एकीकडे वॉटर कपसाठी श्रमदानाची चळवळ उभी राहिली असतानाच जलसंधारणाची मोठी कामे आणि टेंभुचे पाणी शेतकऱयांच्या बांधापर्यंत पोहचविण्यासाठी पोटकालवे खुदाईसाठी नाम फौंडेशनचा मोठा आधार लाभला आहे. टेंभुच्या पाण्यासाठी शक्य तेथे कालवा खुदाई करण्यासाठी, ओढय़ांचे खोलीकरण करण्यासाठी, गाळ काढण्यासाठी नाम फौंडेशनची मोठी चळवळ उभी राहिली असून यामध्ये तालुक्यातील लोकांनी पुढे येण्याची गरज आहे.

आटपाडी तालुक्यातील तडवळे, दिघंची, नेलकरंजी, कुरूंदवाडी, झरे येथे नाम फौंडेशनच्या माध्यमातुन कामांनी गती घेतली आहे. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर, पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी राजकारणविरहीत तालुक्यातील गावागावात नाम फौंडेशनच्या माध्यमातून आलेली मोठी संधी पाणीदार करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार नाम फौंडेशनमध्ये सहभागी होत कामे करून घेणाऱया गावांची संख्या वाढतच आहे.

यपावाडी, बोंबेवाडी येथे नाम फौंडेशनच्या माध्यमातुन कामे करण्यासाठी भाजप नेते गोपीचंद पडळकर, सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी बैठक घेतली. टेंभु योजनेचे पाणी आपल्या गावच्या हद्दीत आणण्यासाठी पोटकालवे खुदाई करून पाणी समस्या सोडविण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली असून नाम फौंडेशन तालुक्यात 25 पोकलॅण्ड मशीन देणार आहे. त्यासाठी आपण फक्त डिझेलची सोय करून मोठमोठी कामे कित्येक दिवस करू शकतो. गावाच्या एकजुटीने व सहभागाने हे शक्य असून राजकारण बाजुला ठेवुन आपण पाण्यासाठी एक होवुया, असे आवाहन गोपीचंद पडळकर, सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी केले.

आटपाडी, करगणी, विठलापूर, घरनिकी, खांजोडवाडी, निंबवडे, शेटफळे आदि गावात नाम फौंडेशनव्दारे कामे करण्यासाठी नियोजन सुरू आहे. लोकांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी एकदिलाने पुढाकार घेण्याची गरज आहे. नाम फौंडेशनव्दारे मोठय़ा प्रमाणात मदत मिळत असून त्यामुळे आपला तालुका जलयुक्त होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गावांनी यामध्ये आपला सहभाग वाढवावा. शिवाय नाम फौंडेशनव्दारे ओढा खोलीकरण, सरळीकरण, नालाबांध, मातीबांध, कालवा खुदाईसाठी लोकांनी संपर्क साधावा, असे आवानही गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

कुरूंदवाडी गावाला टेंभुच्या पाण्याचा लाभ होण्यासाठी कालवा खुदाईचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. शिवाय झरेच्या हद्दीत आलेल्या पाण्याचा वापर जास्तीत जास्त लोकांपर्यंत करण्यासाठी ओढय़ाचे खोलीकरण, रूंदीकरणाचे काम हात घेण्यात आले आहे. आटपाडी तालुक्यातील गावांना मोठय़ा प्रमाणात खुदाईची कामे करण्यासाठी व पाणीसाठा वाढविण्यासाठी एक चांगली संधी सिने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या दातृत्त्वातून मिळाली आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी आटपाडी तालुक्यातील गावांनी एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे.

प्रशासनाचीही मदत

आटपाडी तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाणी पोहचविण्यासाठी नाम फौंडेशनच्या माध्यमातून सुरू असणाऱया कामांना लोकांकडूनच डिझेलची सोय करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी व प्रांतांशी डिझेलसाठी चर्चा झाली असून त्यांनीही मदतीची ग्वाही दिली आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील लोकांनी, विविध संस्थांनी, पदाधिकारी, संघटनांनी नाम फौंडेशनच्या उपक्रमात पुर्ण ताकदीने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप नेते गोपीचंद पडळकर व सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी केले आहे.

Related posts: