|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कचरा व्यवस्थापनात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हावा

कचरा व्यवस्थापनात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हावा 

प्रतिनिधी /फोंडा :

कचरा समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य व्यवस्थापन आवश्यक असते. गोव्यात त्याबाबत चांगल्या पद्धतीने प्रयत्न दिसून येतात. गोव्यातील दहा पालिकांनी घरोघरी कचरा गोळा करून योग्य नियोजन केले जात आहे. आधुनिकीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे हा प्रश्न गंभीर होत चालला असून नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

फर्मागुडी येथील गोवा आभियांत्रिकी महाविद्यालयाच्या खाण आभियांत्रिकी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. काल गुरुवारी सकाळी या दोन दिवसांच्या परिषदेला सुरुवात झाली. ‘खाण आणि उद्योग क्षेत्रातील पर्यावरणीय व्यवस्थापनातील आव्हाने’ हा या परिषदेचा विषय आहे. व्यासपीठावर मुख्य वक्ते कार्मेल महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. डॉ. मनोज बोरकर, गोवा आभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. शेट, गोवा स्टेट सेंटरचे अध्यक्ष गुरुनाथ पर्रीकर, सी. जी. एस. बी. वर्मा, परिषदेचे समन्वयक डॉ. उल्हास सावईकर आदी उपस्थित होते.

मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलीत करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. पर्यावरणातील महत्वाचे घटक असलेली हवा, पाणी आणि माती यांना प्रदूषणाचा वाढता धोका आहे. आधुनिकीकरणामुळे प्रदूषण वाढत असले तरी कालानुरुप त्यावर उपाय योजना आश्यक आहे. गोव्यात कळंगुट येथे अद्ययावत तंत्रज्ञान असलेला कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला असून काकोडा व वेर्णा येथे अशाच प्रकारचे दोन प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. युवा पिढीने पर्यावरण संवर्धनासाठी जागृती करणे गरजेचे आहे, अशी सूचनाही मंत्री ढवळीकर यांनी केली.

प्रमुख वक्ते डॉ. बोरकर यांनी पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी वेळीच योग्य उपाययोजना न झाल्यास भविष्यात मोठय़ा समस्यांना तोंड द्यावे लागेल, असे सांगितले. खाणीमुळे प्रदूषण वाढत असले तरी आधुनिक यंत्रणा उभारून त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. ई कचरा ही आजची मोठी समस्या असून त्या दृष्टीने गांभीर्याने विचार करावा लागणार आहे, असे संकेतही त्यांनी दिले. गुरुनाथ पर्रीकर यांनीही यावेळी विचार मांडले. डॉ. उल्हास सावईकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात परिषद आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. प्राचार्य शेट यांनी स्वागत केले. विविध प्रबंधाचा समावेश असलेल्या स्मरणिकेचे मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता कारखानीस व सत्तेश काकोडकर यांनी तर श्री. वर्मा यांनी आभार मानले. देश विदेशातील दिडशे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.

Related posts: