|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तब्बल नऊ दिवसांनी सोनशी ग्रामस्थांची मुक्तता

तब्बल नऊ दिवसांनी सोनशी ग्रामस्थांची मुक्तता 

प्रतिनिधी /वाळपई :

आपल्या न्याय मागण्यांसाठी सनदशीर मार्गांनी आंदोलन करणाऱया सोनशीतील ग्रामस्थांच्या आक्रमकतेची धग शेवटी सरकारला बसली. सेसा गोवा आणि अन्य खाण कंपन्यांच्या खनिजमाल वाहतुकीमुळे सोनशी गावात निर्माण झालेल्या प्रदुषणाविरोधात आंदोलन करणाऱया 45 ग्रामस्थांना वाळपई पोलिसांनी गुन्हा नोंदवून सर्वांना कोलवाळ कारागृहात पाठविले होते. याबाबत सरकारवर बरीच टीका झाली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर गुरूवारी सायंकाळी कागदपत्रांची पुर्तता करण्यात आल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे आदेशाने सर्व आंदोलकांची मुक्तता करण्यात आली आहे. 

दि. 11 रोजी सोनशी गावातून होणारी खनिजमालाची बेकायदेशीर वाहतूक रोखल्यामुळे वाळपई पोलिसांनी या आंदोलकांना अटक केली होती. त्यादिवसापासून ते सर्वजण कोलवाळ कारागृहात होते. यामुळे या प्रकाराने वेगळेच वळण घेतले. या आंदोलनाचे पडसाद गोव्याच्या विविध क्षेत्रात उमटले. सरकारने या आंदोलकांच्या मुक्ततेसाठी प्रयत्न केले आहेत. मात्र जोवर मागण्या मान्य होत नाहीत, तोवर जामीन घेण्यास या आंदोलकांनी नकार दिला होता.

रोजगार नाहीच : सेसा गोवा

सरकारने याबाबत ग्रामस्थ प्रतिनिधी व खाण कंपनींचे प्रतिनिधी यांच्यात संयुक्त बैठक घेतली. त्यात ग्रामस्थांनी खाण कंपनीने आपल्याला रोजगार देण्याची मागणी केली होती, ती कंपनीने फेटाळली. त्यामुळे हे मिटत आलेले प्रकरण आणखी चिघळले. 

दरम्यान गुरूवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याप्रकरणी विशेष लक्ष घालण्याचे सूतोवाच केल्याने आंदोलनकर्त्यांनी आपली मुक्तता करण्यास मान्यता दिल्याचे ग्रामस्थांचे ऍड. रविराज चोडणकर यांनी स्पष्ट केले. यावेळी सेसा गोवा खाण कंपनीकडून वाळपई पोलीस स्थानकात कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली.

Related posts: