|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पंचायत निवडणूक मे मध्येच घ्यावी

पंचायत निवडणूक मे मध्येच घ्यावी 

प्रतिनिधी /पणजी :

राज्यातील पंचायत निवडणूक पुढे न ढकलता मे 2017 मध्येच घेण्यात याव्यात, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी पंचायत निवडणुकीची घोषणा केली असून 25 जून रोजी निवडणुका होतील, असे जाहीर केले आहे.

पर्रीकरांच्या घोषणेनंतर तात्काळ फालेरो यांनी याची दखल घेऊन त्यावर चर्चा केली. काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या काल झालेल्या बैठकीवेळीही यावर चर्चा करून नंतर दुपारी राज्य निवडणूक आयोगाला त्यांनी निवेदन सादर केले. याप्रकरणी निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करून पंचायत निवडणूक ठरल्या वेळेतच घेण्यात याव्यात, अशी मागणी केली.

निवडणूक पुढे ढकलणे योग्य नव्हे

पंचायत निवडणूक कालावधी मे मध्ये संपत असल्याने सर्व प्रक्रिया पूर्ण करून मे महिन्यातच निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. लोकशाहीच्या दृष्टीने आणि कायद्याच्या दृष्टीकोनातूनही निवडणूक पुढे ढकलणे हे योग्य नव्हे.

मुख्यमंत्री घोषणा कशी करतात?

त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाऐवजी मुख्यमंत्री पंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची घोषणा करतात हे जास्त धक्कादायक असल्याचेही फालेरो यांनी नमूद केले आहे. राज्यातील पंचायत निवडणूक घेण्याचे अधिकार सर्वस्वी निवडणूक आयोगाचे आहेत आणि अशा स्थितीत मुख्यमंत्री घोषणा करतात. यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण होतो, असेही ते म्हणाले.

जून महिन्यात पडतो भरपूर पाऊस

पंचायत निवडणूक मे महिन्यातच घेण्यात येणार, याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्ट करणे गरजेचे आहे. जेणेकरुन नवीन पंचायत मंडळांना लोकशाही प्रणालीनुसार पदभार सांभाळणे शक्य होईल. जून महिन्यात राज्यात पाऊस असतो त्यामुळे पंचायत निवडणुका जूनमध्ये घेतल्या जाऊ नयेत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Related posts: