|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी आराखडा तयार करा!

शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी आराखडा तयार करा! 

सिंधुदुर्गनगरी : जिल्हय़ातील शेतकऱयांनी उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर करावा. प्रतीवर्षी किमान खरीप, रब्बी हंगामासह तीन पिके घ्यावीत, या अनुषंगाने कृषी विभागाने शेतीच्या यांत्रिकीकरणाचा नियोजनबद्ध आराखडा तयार करावा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यानी जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत दिले. यावेळी यंदाच्या खरीप हंगामासाठी 67 हजार 650 हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.

येथील जिल्हा नियोजन समितीच्या (जुन्या) सभागृहात आयोजित या खरीप हंगाम आढावा जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अप्पर जिल्हाधिकारी रवींद सावळकर, जिल्हा कृषी अधिकारी म्हात्रे व कृषी विभागाचे अधिकारी तसेच खाते प्रमुख उपस्थित होते.

सुधारित पद्धतीच्या भात जातीच्या लागवडीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रत्येक गावात माहिती देणारे बॅनर्स लावावेत, अशी सूचना करून पालकमंत्री केसरकर म्हणाले की, कृषी विभागाने जिल्हय़ात गाव-निहाय किती विहिरी उपलब्ध आहेत, किती विहिरीवर पंप आहेत याची माहिती संकलित करावी. पाण्याची साठवण वाढावी, शेतीला पुरेसे पाणी मिळावे यासाठी किती वळण बंधाऱयांची गरज आहे. तसेच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱयांची किती गरज आहे, याचेही सर्वेक्षण करून अद्यावत माहिती संकलीत करावी. उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होण्याबरोबरच वर्षभरात किमान तीन पिके शेतकऱयांनी घ्यावीत. यासाठी कृषी विभागाने प्रयत्नशील राहवे, असे यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सौर उर्जेवर कृषीपंप जोडण्या देण्यासाठी महावितरण कंपनीने तीनशे शेतकरी होतील, यासाठी प्रयत्न करावेत. कृषी विभागाने पंधरा दिवसात शेती यांत्रिकीकरण, पाणीसाठा वाढविण्याबाबत सविस्तर आराखडा घ्यावा. खरीप भात शेतीच्या प्रमाणात रब्बी हंगामात केवळ पाच टक्के भातशेती होते. हे प्रमाण अत्यंत व्यस्त आहे. उन्हाळी भातशेतीचे प्रमाण वाढविण्यासाठी कृषी विभागाने सर्वेक्षण करावे आदी सूचना यावेळी केल्या.

खरीपसाठी 67 हजार 750 हेक्टर लक्षांक

यंदाच्या खरीप हंगामासाठी 67 हजार 750 हेक्टर क्षेत्राचा लक्षांक निर्धारित केला आहे. यामध्ये भात 63 हजार हेक्टर, नागली दोन हजार हेक्टर, इतर तृणधान्ये 200 हेक्टर, कडधान्ये दोन हजार हेक्टर तर तेलबिया 550 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. जिल्हय़ातील बियाणे विक्रेते 181 आहेत. खत विक्रेते 248 यापैकी सहकारी 248 यापैकी सहकारी 248 यापैकी सहकारी संघ व सोसायटय़ा 118 आहेत. किटकनाशके विक्रेते 137 आहेत. खरीप हंगाम 2017 साठी 22 हजार 175 मेट्रीक टन खताची मागणी केली आहे. तर सात हजार 531 क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. सुधारित व संकलित भात बियाणे यंदाच्या हंगामात सात हजार 531 क्विंटल बियाणे वितरणाचे नियोजन केले आहे. रासायनिक 22 हजार 175 मेट्रीक टनाची मागणी नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

4346 शेतकऱयांना आंबा नुकसान भरपाई वितरण

जिल्हय़ातील चार हजार 346 आंबा उत्पादक शेतकरी तर 117 काजू उत्पादक शेतकऱयांना अनुक्रमे 13 केटी 58 लाख 11 हजार व नऊ कोटी 40 लाख नुकसान भरपाई वितरित केली आहे. हवामानावर आधारीत पथदर्षी फळपीक विमा योजना अंतर्गत 2016-17 मध्ये आंबा 5711 शेतकरी, काजू 128 तर केळी 11 शेतकरी सहभागी झाले आहेत. या अनुषंगाने आंबा दोन कोटी 88 लाख, काजू 42 लाख 96 हजार, तर केळी 46 हजार रुपये विमा हप्ता रक्कम भरलेली आहे.

21 एप्रिल रोजी झालेल्या खरीप 2016-17 जिल्हास्तरीय आढावा सभेतील उपस्थित मुद्यांबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही झाली असल्याची माहिती या सभेत देण्यात आली. यामध्ये श्री पद्धतीने भात लागवडीचे 880 हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके गत खरीप हंगामात घेण्यात आली तसेच चतुसुत्री 800 हेक्टर व सगुणा भात उत्पादन तंत्रज्ञान 80 हेक्टर क्षेत्रावरील प्रत्यक्षीके घेण्यात आली. कृषी अभियांत्रिकीकरण उपअभियान योजनेंतर्गत तीन कोटी 31 लाख 88 हजार रुपये निधी खर्च झाला. उन्हाळी हंगामात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी एन. बी. 21 या गवताच्या वाणाचे तीन हजार ठोबांचे वाटप केले आहे. हिरव्या चाऱयासाठी शंभर टक्के अनुदानावर 61 हजार 560 किलो बियाणांचे वितरण करण्यात आले. अनामत रक्कम भरलेल्या एक हजार 878 कृषी पंपापैकी 871 कृषीपंपाना वीज जोडणीचे काम पूर्ण केले. जिल्हास्तरापासून विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटय़ांपर्यंत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार दोन हजार 800 एवढे नवीन सभासद होऊन त्यांनी 9कोटी 83 लाख 20 हजार रुपयांच्या कर्जाची उचल केली आहे. जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत 2016-17 या वर्षाकरिता जिल्हय़ातील 23 गावांची निवड करण्यात आलेली आहे. 374 कामांसाठी 16 कोटी 46 लाख 69 हजार आराखडा तयार केला असून मार्च 2017 अखेर 38 कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर तीन कोटी 16 लाख 51 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.

प्रारंभी अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेकळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. सन 2016-17 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱया कृषी कर्मचाऱयांचा यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बाबली सहदेव गाड, अशोक पारकर, सुधाकर कारवडे, विवेकानंद नाईक व दिगंबर राणे यांचा सत्कार करण्यात आला.

Related posts: