|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विद्यापीठातील मानसी हुपरीकर, नीलम यादवच्या यश

विद्यापीठातील मानसी हुपरीकर, नीलम यादवच्या यश 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रात शिकणाऱया विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञानाच्या संधी खुल्या करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त सन 2012मध्ये ‘स्कूल ऑफ नॅनो सायन्स ऍन्ड टेक्नॉलॉजी’ची स्थापना करण्यात आली. येथे बी.एस्सी.-एम.एस्सी. एकात्मिक अभ्यासक्रम सुरू झाला आणि या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच बॅचच्या मानसी हुपरीकर या विद्यार्थिनीला जर्मनीमध्ये संशोधनाची संधी मिळाली आहे. तर बी.एस्सी.मध्ये शिकणाऱया नीलम यादव या विद्यार्थिनीला 30 लाखांच्या शिष्यवृत्तीसह फ्रान्समध्ये पुढील उच्चशिक्षणाची संधी मिळाली आहे. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन केले,

स्कूल ऑफ नॅनो सायन्स ऍन्ड टेक्नॉलॉजीचे समन्वयक म्हणून पदार्थविज्ञान शास्त्राच्या प्रा.डॉ. पी.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे काय सुरू आहे.   बारावीनंतर विद्यार्थ्यांना बी.एस्सी.-एम.एस्सी. एकात्मिक अभ्यासक्रम येथे उपलब्ध करून देण्यात आला. नॅनो-विज्ञान व तंत्रज्ञानातील आधुनिक ज्ञान त्यांना प्राप्त व्हावे आणि संशोधनाची संधी मिळावी हा हेतू आहे. या शाखेच्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी मानसी हुपरीकर सध्या एम.एस्सी. भाग-2 मध्ये शिक्षण घेत आहे. तिला जर्मनीमधील मारबर्ग येथील जगप्रसिद्ध फिलिप्स विद्यापीठात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक प्रा.डॉ. वोल्फगँग पारक यांच्याकडे इंटर्नशीप करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

बी.एस्सी. भाग-3 मध्ये शिक्षण घेत असलेल्या नीलम यादव या विद्यार्थिनीला फ्रान्समधील पॅरिस-सुड विद्यापीठात पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी  संधी मिळाली आहे. तिला पुढील दोन वर्षांसाठी तिला इरॅस्मस मुंडस ही सुमारे 30 लाख 66 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळाली आहे.तिला स्कूल ऑफ नॅनोसायन्स ऍन्ड टेक्नॉलॉजी अधिविभागाचे समन्वयक व विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह डॉ. के.के. शर्मा, आणि डॉ. शिवदत्त प्रभू यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. पी.डी. राऊत उपस्थित होते.

‘सर्वसामान्य कुटुंबातील मुलींचे यश’

मानसी हुपरीकर आणि नीलम यादव या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थीनींनी मिळविलेले यश प्रेरणादायी आहे. नीलम यादव ही मूळची उत्तर प्रदेशातील असून तिचे वडील घनश्याम यादव हे पेंटर कॉन्ट्रक्टर आहेत. व्यवसायानिमित्त हे कुटुंब कोल्हापुरात स्थायिक झाले आहे. तिने सुमारे 30 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून आईवडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. मानसी हुपरीकर हिचे वडील प्रमोद हुपरीकर हे इचलकरंजीच्या शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत, तर आई गृहिणी आहे. मानसीला आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधकांसमवेत संशोधन करण्याची संधी मिळते आहे, ही अभिमानाची बाब आहे.