|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुंडई येथे कॉक्रिटवाहू ट्रक कलंडला

कुंडई येथे कॉक्रिटवाहू ट्रक कलंडला 

प्रतिनिधी/ फोंडा

दातोळवाडा-कुंडई येथे कॉक्रीटवाहू ट्रक कलंडून चालकासह तिघे जण जखमी झाल्याची घटना काल शुक्रवारी सकाळी 9 वा. घडली. चालक राजन सत्यनारायण (वय. 48 मूळ झारखंड) हा गंभीर जखमी झाला व अन्य तिघे सहकारी रणदिल कुमार मेहतू (वय. 30, झारखंड), गोविंद तूलशी (वय. 28 मूळ उ.प्रदेश), शरद लगवडकर (वय. 25, मूळ लातूर) हे किरकोळ जखमी झाले असून यातील दोघे गोमेकॉत उपचार घेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार कॉक्रिटवाहू जीए 06 पी 1347 हा आरएमसी ट्रक दातोळवाडा नवदुर्गा देऊळाजवळच सूरू असलेल्या घराच्या स्लॅब बांधकामासाठी कॉक्रिटची ने आण करीत होता. नेहमीचा चालक नसल्याने अन्य दुसऱया चालकाला या चढणीचा अंदाज आला नाही व पाठीमागे चडणीवर वळून बांधकाम स्थळावर गाडी परतवताना गाडीवरील ताबा गेल्याने तो सरळ 10 फुट खाली खाईत कोसळला. मागील बाजूने चडणीवरून खाली येताना विजेच्या लोखंडी खांबाला धडक दिली व दोन झाडाना जमिनदोस्त करीत खाली कोसळला. कोसळताना गाडीतील वजनामूळे संरक्षक भिंतीला तडा गेला व सरंक्षक भितीचे दगड गाडीतील चालक व आतील कामगारावर आपटल्यामुळे एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून अन्य तिघे किरकोळ जखमी झाले.

फोंडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व जखमीना तातडीने मडकई येथील उप-आरोग्य केद्रात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीरतेमुळे अन्य तिघांना बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.  सद्या सुट्टीचे दिवस असून याच जागेवर नेहमी लहान चिरमुंडे रस्त्याशेजारी खेळत असतात व देवळासमोरील रस्त्यावर भाविक वाहने पार्क करून दर्शनासाठी जात असतात केवळ दैव बलवत्तर म्हणून जिवितहानी टळली असे येथील ग्रामस्थ बोलत होते. याप्रकरणी फोंडा पोलिस स्थानकांचे हवालदार संदीप खाजनकर पुढील तपास करीत आहे. 

Related posts: