|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मांगोरहिल वास्कोत अज्ञातांकडून सात वाहनांची नासधूस

मांगोरहिल वास्कोत अज्ञातांकडून सात वाहनांची नासधूस 

प्रतिनिधी / वास्को

मांगोरहिल वास्को भागात रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवण्यात आलेल्या सात चारचाकी वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. गुरूवारी रात्री किंवा शुक्रवारी पहाटे ही नासधूस करण्यात आली असण्याची शक्यता असून वास्को पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरूध्द गुन्हा नोंद केला आहे.

मांगोरहिल येथील गुरूव्दाराजवळ तसेच एमईएस(नौदल)च्या कुंपणाशेजारी मुख्य रस्त्याच्या बाजुलाच रोज रात्री चारचाकी वाहने पार्क करण्यात येत असतात. या वाहनांचे मालक व चालक याच भागात राहातात. काल शुक्रवारी सकाळी या ठिकाणी पार्क करण्यात आलेली चार व्हेगनर कार, एक तावेरा, एक मारूती सुझुकी इको व एक टाटा येस रिक्षा मिळून सात वाहनांच्या काचा फोडून या वाहनांची नासधूस करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या परिसरात खळबळ माजली.  गुरूद्वाराजवळील रस्त्याच्या बाजुला दोन कार गाडय़ा रोजच्या ठिकाणीच पार्क करून ठेवण्यात आल्या होत्या. तर अन्य पाच गाडय़ा मिलिटरी इंजीनीयरींग सर्व्हिसेसच्या रस्त्याच्या बाजुला पार्क करून ठेवण्यात आल्या होत्या. या गाडय़ांमध्ये काही खासगी पर्यटक कार तर काही खाजगी वाहने होती.

पार्क करून ठेवण्यात आलेल्या या गाडय़ांवर दगड टाकून नासधूस करण्यात आल्याचे दिसून आले. एकाच रात्री सात गाडय़ा एकाच पध्दतीने फोडण्यात आलेल्या आहेत. या घटनेप्रकरणी संबंधीत मालकांनी वास्को पोलीस स्थानकात तक्रारी केलेल्या असून पोलिसांनी अज्ञातांविरूध्द गुन्हा नोंद केला आहे. वास्को पोलीस अधिक तपास करीत आहेत. दोन गटातील पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Related posts: