|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कदंब वाहतुक महामंडळ देशातील प्रथम क्रमांकाचे महामंडळ बनवण्याचे लक्ष्य-

कदंब वाहतुक महामंडळ देशातील प्रथम क्रमांकाचे महामंडळ बनवण्याचे लक्ष्य- 

प्रतिनिधी/ वास्को

कदंब वाहतुक महामंडळ आपल्या सेवांमध्ये दर्जात्मक वाढ करणार असून हे महामंडळ जनतेला आपले वाटावे यासाठी महामंडळ विविध योजना आखणार आहे. कदंब वाहतुक महामंडळ देशातील प्रथम क्रमांकाचे महामंडळ बनवण्याचे लक्ष्य महामंडळाने ठेवलेले असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष आमदार कार्लुस आल्मेदा यांनी सांगितले.

शुक्रवारी वास्कोत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार कार्लुस आल्मेदा यांनी कदंब महामंडळाच्या मागच्या पाच वर्षांतील प्रगतीविषयी सांगून हे महामंडळ अधिकाअधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. जनतेला चांगली सेवा देतानाच या महामंडळाच्या कर्मचाऱयांच्या हिताकडेही लक्ष देण्यात येणार आहे. कर्मचाऱयांच्या कौटुंबीक समस्या असतात. त्यामुळे त्यांच्यावरही मानसिक ताण असतो. कर्मचाऱयांच्या समस्यांची सोडवणुक करण्यासाठी महामंडळ आता कर्मचाऱयांच्या कुटुंबियांशी थेट चर्चा करणार असल्याचे आमदार कार्लुस आल्मेदा म्हणाले. कर्मचाऱयांच्या समस्या सुटल्यास महामंडळाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदतच होईल असे ते म्हणाले. जनतेला चांगली व सोयीस्कर सेवा देण्याचा एक भाग म्हणून कदंब महामंडळाच्या बसगाडय़ा लवकरच प्रवाशांना शहरापर्यंत पोहचवण्याचे व शहरातूनच त्यांना बसमध्ये घेण्याचे नियोजन करणार असून कदंबच्या बसगाडय़ा आता केवळ बस स्थानकापर्यंतच थांबणार नाहीत तर या बसगाडय़ा प्रवाशांना शहरात सोडतील व शहरात थांबलेल्या प्रवाशांना तीथेच बसमध्ये घेतील. त्यामुळे प्रवाशांचा वेळ व पैसा वाचेल असे आमदार कार्लुस आल्मेदा म्हणाले. कदंबच्या सेवांमध्ये दर्जात्मक वाढ करून कदंब वाहतुक महामंडळ देशातील प्रथम क्रमांकाचे महामंडळ बनवण्याचे लक्ष्य कदंब महामंडळाने ठेवलेले असल्याचे ते म्हणाले.

वास्कोतील आल्मेदा हॉलमध्ये कदंबचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठीही शुक्रवारी सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरीक नेटो परेरा, सहाय्यक अभियंता गुरूदास नाईक, डेपो व्यवस्थापक टाईक परेरा तसेच ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाचे कौस्तुभ कामत उपस्थित होते. कदंब महामंडळाच्या बसगाडय़ा तसेच त्यांच्या कर्मचाऱयांना अपघातांपासून दूर ठेवण्यासाठी ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे कदंबच्या चालकांना समुपदेश व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वास्को, मडगाव, पणजी, फोंडा, पर्वरी अशा प्रमुख ठिकाणी हे कदंबच्या चालकांसाठी हे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या कार्यक्रमात या विशेष उपक्रमाची माहिती महामंडळातर्फे देण्यात आली.

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरीक नेटो परेरा यांनी यावेळी बोलताना कदंब महामंडळाला अधिक विकासासाठी अधिक नियोजन करावे लागणार असून त्यासाठी आम्ही विकासाच्या मार्गावर आता कुठे आहोत आणि आम्हाला कुठपर्यंत जायला हवे याचा मार्ग निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

 

Related posts: