|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आंदोलकांच्या सुटकेने सोनशी ग्रामस्थांमध्ये आनंद

आंदोलकांच्या सुटकेने सोनशी ग्रामस्थांमध्ये आनंद 

प्रतिनिधी/ वाळपई

खनिज वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या समस्यांविरुद्ध आंदोलन करणाऱया सोनशी ग्रामस्थांना अटक करुन तब्बल नऊ न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. गुरुवारी रात्री उशिरा त्यांची सुटका झाल्यानंतर आज शुक्रवारी सोनशी गावात आनंदाचे वातावरण पसरले होते. न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱयांना सरकारने कोठडीत ठेवल्याचा रागही नागरिकांच्या मनात खदखदत असल्याचे त्यांनी प्रतिक्रियांमधून जाणवत होते. सतत धुळीने माखलेले सोनशी गावातील रस्ते सध्या चकाचक झालेले पाहून आंदोलनकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच सेसा गोवा कंपनीने ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे शुद्ध पाणी व आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी मान्य केली आहे.

दर मिनिटाला 10 पेक्षा जास्त खनिज मालाची वाहतूक करणाऱया ट्रकांना या मार्गावरुन पूर्णपणे विराम देण्यात आला आहे. सेसा गोवा व इतर कंपन्यांची होणारी खनिज मालाची वाहतूक गेल्या चार दिवसांपासून ‘मराठा सडा’ भागातून वळविण्यात आल्याने सोनशी गावाने प्रदुषणापासून आराम घेतला आहे. खनिज वाहतूक सुरु झाल्यापासून सोनशीतील ग्रामस्थ खनिज वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणी करीत आहेत मात्र त्यांच्या मागणीला कंपनी केराची टोपली दाखविली. शेवटी त्रस्त नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. आंदोलकांना अटक केल्यानंतरही विविध मार्गाने हे आंदोलन सुरुच ठेवल्याने खनिज कंपन्यांबरोबच सरकारी यंत्रणाही खडबडून जागी झाली व शेवटी खनिज मालाची वाहतूक सोनशी गावातून वगळून इतर भागातून वळविण्यात आली आहे. खनिज कंपन्यांनी गावातील रस्ता धुवून चकाचक केला आहे.

सोनशी गावातून होणारी वाहतूक बंद झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात होणारे धूळ प्रदूषण रोखले गेले आहे. वारंवार समस्या सोडविण्याची मागणी करुनही दुर्लक्ष करण्यात येतो व त्यामुळे ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, ही खरोखरच खेदाची बाब आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

शुद्ध पाण्याच्या पुरवठय़ासाठी खास जलवाहिनी

सेसा गोवा खाण कंपनीच्या व्यवस्थापनाने सोनशी गावा भासणारी पिण्याच्या पाण्याची समस्या मिटविण्यास मान्यता दिली आहे. सोनशी गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी खास जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. यासाठी लागणारा सर्व खर्च सेसा कंपनी उचलणार असल्याचे आश्वासन कंपनीने संयुक्त बैठकीत दिले आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे गढूळ पाण्यावर आपली तहान भागविणाऱया सोनशी वासियांना टँकरपासून मुक्ती मिळणार आहे.

मोबाईल हॉस्पिटलची सेवा मिळणार

खनिज कंपन्यांच्या कारवायामुळे सोनशी ग्रामस्थांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. यासाठी आरोग्याच्या सुविधा देण्याची मागणी नागरिकांनी केली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर सेसा गोवा खाण कंपनीने सोनशी गावातील सरकारी प्राथमिक शाळेत मोबाईल हॉस्पिटलची सोय करण्याची तयारी दर्शविली आहे. सप्ताहातून तीन दिवस ही सेवा देण्यात येणार आहे.

Related posts: