|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सोनूसवासियांना प्रतिक्षा शुद्ध पिण्याच्या पाण्याची

सोनूसवासियांना प्रतिक्षा शुद्ध पिण्याच्या पाण्याची 

प्रतिनिधी/ वाळपई

सोनूस गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र स्वरूपाची टंचाई ही प्रमुख समस्या सर्वांनाच भासत आहे. एकेकाळी गावातून सोनूस नाल्याचे पाणी बारामाही खळखळून वाहत होते. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे चोहोबाजूंनी मोठय़ा प्रमाणात वाढलेला खनिज खाणीचा व्यवहार. सध्या गावात पाण्याचे पूर्णपणे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. नैसर्गिक पाण्याचे स्त्राsत जेव्हा अस्तित्वात होते तेव्हा पिण्याच्या पाण्याची कोणतीही समस्या नव्हती. आता खनिज कंपन्यांकडून टँकरद्वारे उपलब्ध होणाऱया पाण्याची प्रतिक्षा करावी लागत आहे.

सोनूस गावातील नागरिकांचे आंदोलन हे आपल्या अस्तित्वासाठी आहे. कारण शिक्षण, निरोगी जीवन, पाणी, प्रदूषण विरहित खनिज खाणीचा व्यवहार हा महत्वाचा मुद्दा सर्वांच्याच मनावर बसला आहे. यामुळे ग्रामस्थांचे आंदोलन तीव्र होऊन शासनासमोर या समस्यांचा उद्रेक पोचलेला आहे.

पिण्याच्या पाण्याची समस्या व ग्रामस्थांचे आरोग्य हा संलग्नित राहणारा खरा प्रश्न आहे. गावाच्या पाणी सोईसाठी दोन विहिरी होत्या. पूर्वी याच पाण्यावर ग्रामस्थ आपली पाण्याची तहान भागवित होते. सध्या सदर विहिरी पूर्णपणे आटल्या आहेत. सेसा गोवा, केणी, फोमेंतो, तिंबलो व इतर कंपन्यांच्या खनिज उत्खननाची खोली एवढी खाली गेली आहे कि भूगर्भातील गावातील पाण्याचे स्रोत सुकले आहे. यामुळे पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. सध्या सेसा गोवा खाण कंपनीतर्फे पाण्याची सोय टँकरद्वारे करण्यात आली आहे. मात्र सदर पाणी खरोखरच पिण्याच्या दर्जाचे आहे का? असा सवाल आंदोलनाच्या माध्यमातून निर्माण झाला आहे. टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठय़ातील पाण्याचा दर्जा पिण्यासारखा नाही. नागरिकांनी अनेकवेळा शुद्ध स्वरूपाचे पाणी पुरवठा करण्याची मागणी कंपनीकडे केली होती मात्र याचा कोणताच फायदा झालेला नाही. यामुळे नागरिकांवर गढूळ स्वरूपाचे पाणी वापरण्याची पाळी आली आहे. अनेकवेळा टँकरद्वारे होणाऱया पाणी पुरवठय़ातून बॅरल्स भरून ठेवण्यात येतात मात्र रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात होणाऱया वाहतुकीमुळे धुळीचे साम्राज्य पाण्यावर पसरलेले असते. यामुळे अशाच स्वरूपाचे पाणी पिण्याची पाळी त्यांच्यावर येत असते.

एकेकाळी गावाचे वैभव समजल्या जाणाऱया सोनूस नाला खाण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे व अनियोजित कारवायांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सध्या नष्ट होण्याची प्रक्रिया सुरूच झाली आहे. कारण सदर नाल्यात खनिजमिश्रित मातीचा थर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे पाण्याचा स्रोत जवळपास पूर्णपणे आटला आहे. यामुळे गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पूर्वी याच नाल्याच्या पाण्यावर नागरिकांचे जीवन विसंबून राहत होते मात्र खनिज कंपन्यांच्या वाढत्या अतिरेकामुळे नाल्याचे अस्तित्व पूर्णपणे धोक्यात आले आहे. तसेच याचा परिणाम पिण्याच्या पाण्यावर झाला आहे. सध्या या नाल्यात पूर्णपणे मातीचा थर दाटलेला आहे. याची उपसणी वेळोवेळी करण्याची काळाची गरज आहे अन्यथा या नाल्याची ओळख फक्त कागदावर राहणार आहे. यामुळे सरकारने खासकरून जलसिंचन खात्याने लक्ष देण्याची मागणी होताना दिसत आहे. या नाल्याच्या पाण्याचा स्रोत सुप्रसिद्ध हरवळे येथील धबधब्यासाठी होत असतो. हल्लीच्या काळात सदर धबधब्याचा रंगच बदलू लागला आहे. धबधब्यात पाहायला मिळणारे शुभ्र पाणी तांबडय़ा रंगाचे होऊ लागले आहे. सरकारने निष्काळजीपणा केल्यास सदर धबधब्याचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे.

सध्या सोनूस नागरिकांच्या प्रखर आंदोलनामुळे सेसा गोवा खाण कंपनीने पिण्याच्या पाण्याची समस्या पूर्णपणे निकाली काढण्याची तयारी दाखविली आहे. यासाठी खास जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. यामुळे येणारा पूर्ण खर्च याची जबाबदारी कंपनी करणार आहे. अशा स्वरूपाचे आश्वासन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आले आहे. याची पूर्तता कधी होणार हे पाहावे लागणार आहे. तोवर ग्रामस्थांना टँकरद्वारे होणाऱया गढूळ पाण्यावर दिवस काढावे लागत आहेत.

Related posts: