|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » संघटनात्मक कार्यासाठी अमित शहा जुलैमध्ये गोव्यात

संघटनात्मक कार्यासाठी अमित शहा जुलैमध्ये गोव्यात 

भाजप प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी दिली माहिती

प्रतिनिधी/ पणजी

भाजपच्या संघटनात्मक कार्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 1 व 2 जुलै रोजी गोव्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मये व कुंभारजुवे गटसमिती बदलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पणजीतील मिनेझिस ब्रागांझा हॉलमध्ये भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना श्री. तेंडुलकर म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांना ग्रामपंचायत निवडणुकीवर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. कारण त्यांचे सरकार असताना त्यांनी देखील ग्रामपंचायत निवडणूक पुढे ढकलल्या होत्या आणि नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्या घ्याव्या लागल्या याची जाणीव त्यांनी ठेवावी.

पर्रीकरांसाठी सात आमदारांची राजीनाम्याची तयाराr

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना निवडून आणण्यासाठी सुमारे सात आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले. तथापि, त्यांची नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दर्शवला. सहा महिन्यांच्या आत पर्रीकर यांना निवडून येणे आवश्यक असल्याने कालांतराने पर्रीकर कुठून लढणार आणि कोणता आमदार राजीनामा देणार ते कळणार असल्याची टिप्पणी तेंडुलकर यांनी केली.

पं. दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी साजरी करणार

पं. दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येणार असून त्यासाठी 400 कार्यकर्ते काम करतील. स्वच्छ भारत योजनाही त्याचवेळी राबवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. उत्तर गोवा खासदार व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी कार्यकारिणी बैठकीचे उद्घाटन केले. पक्ष संघटना बळकट करण्यावर बैठकीत चर्चा झाली. ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर नको तथापि भाजपचे कार्यकर्ते निवडणुकीत उतरणार, असे त्यांनी सांगितले.

राजकीय ठराव संमत

आमदार नीलेश काब्राल यांनी बैठकीत राजकीय ठराव मांडले आणि ते सर्वसंमतीने मान्य करण्यात आले. काँग्रेस पक्ष 17 जागा मिळूनही सत्ता स्थापनेचा दावा करण्यास आणि सरकार करण्यास अपयशी ठरला. त्या पक्षाला साधे बहुमत पूर्ण करण्यासाठी इतर आमदारांचा पाठिंबा मिळाला नाही. काँग्रेस पक्ष सत्तेसाठी त्यांचा नेताही वेळेवर निवडू शकला नाही, अशी टीका एका ठरावातून करण्यात आली आहे.

इतर आमदारांनी पाठिंबा दिल्याने भाजप हा सत्तेसाठी पहिली पसंती म्हणून पुढे आला. पर्रीकरांसाठी इतर आमदारांनी पसंती दर्शवली व ते पुन्हा गोव्यात आले आणि मुख्यमंत्री बनले. गोव्याचा विकास पर्रीकर सरकार करेल आणि इतर पक्षांना देखील भाजप व पर्रीकर योग्य वाटले आणि पर्रीकरांचे नेतृत्व त्या पक्षांनी स्वीकारले. पर्रीकर सरकार सर्व अपूर्ण विकासकामे पूर्ण करेल आणि चांगले प्रशासन देईल, अशी खात्री दुसऱया एका ठरावातून वर्तविण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार ठरावातून मानण्यात आले आहेत.

Related posts: