|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » बेस्टमध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात

बेस्टमध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात 

बेस्टच्या 2,648 बसेसमध्ये फायर एक्स्टिंग्विशर असून 1,150 बसेसमध्ये फायर एक्स्टिंग्विशर लावलेले नसल्याची बाब माहिती अधिकाराअंतर्गत उघड झाली आहे. एखाद्या वेळी काही अनुचित प्रकार घडून बसला आग लागली तर या 1150 बसेसमध्ये आग विझवण्यासाठी फायर एक्स्टिंग्विशर नसल्याने लाखो प्रवाशांचे जीव धोक्यात आहेत.

बेस्टच्या नियमानुसार प्रत्येक बसमध्ये कमीत कमी दोन फायर एक्स्टिंग्विशर लावणे बंधनकारक असूनही या 1150 बसेसमध्ये फायर एक्स्टिंग्विशर नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसंबंधीही धोरण नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. सिंगल डेकर बसमध्ये 12 आसने फक्त महिलांसाठी आरक्षित आहेत तर डबल डेकरमध्ये 10 आणि वातानुकूलित बसमध्ये 6 आसने आरक्षित असल्याची माहिती मिळाली.

प्रवाशांच्या मदतीसाठी बेस्टची 1800227550 या क्रमांकाची हेल्पलाइन असून ती 24 तास काम करते. मात्र, ही माहिती प्रवाशांकडे कशी पोहचावी याबाबत काहीच धोरण नाही. कोणत्याही बसवर किंवा आगारावर अथवा थांब्यावर हा हेल्पलाईन क्रमांक लावलेला किंवा लिहिलेला दिसत नाही, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिली.

कोट

बेस्ट समितीच्या पुढच्या बैठकीत आम्ही हा मुद्दा घेऊ. तसेच मागे घडलेल्या घटनेनंतर आम्ही प्रशासनाला याबाबत विचारणा केली होती. परंतु, समाधानकारक उत्तर मिळाले नाही. बेस्ट मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असल्याने पालिकेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.