|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मुंबईतील पुनर्विकासाचा प्रश्न सोडवणार

मुंबईतील पुनर्विकासाचा प्रश्न सोडवणार 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही    येत्या दोन वर्षात पोलिसांना हक्काचे घर देणार

प्रतिनिधी/ मुंबई

बीडीडी चाळींप्रमाणे येत्या दोन वर्षात मुंबईतील सर्व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली. याशिवाय पुढील दोन वर्षात पंतप्रधान आवास योजनेतून पोलिसांना हक्काचे घर दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या भूमिपूजनाचा नारळ फोडून मुख्यमंत्र्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याचे बोलले जात आहे.

नायगाव आणि ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेचे भूमिपूजन शनिवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले. वरळीच्या जांबोरी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हाडाने केलेल्या नियोजनामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना 68 टक्के जमीन ही चाळकऱयांच्या घरांसाठी असणार आहे. तर उर्वरित 32 टक्के जमिनीची विक्री करण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

मी विधानसभेत प्रवेश केला तेव्हापासून एकही अधिवेशन असे गेले नाही की ज्यात बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची चर्चा झाली नाही. बीडीडी चाळींची जमीन ही सोन्याचा तुकडा आहे. आधीच्या सरकारकडे असलेला इच्छाशक्तीचा अभाव आणि चाळीच्या जागेवर बिल्डर लॉबीने ठेवलेला डोळा यामुळे पुनर्विकासाच्या कामाकडे दुर्लक्ष झाले. मात्र, या सरकारने पुनर्विकासाच्या कामात प्राधान्याने लक्ष घालून पुनर्विकासाला गती दिली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

पुढील 50 वर्षाचा विचार करून इमारतींचे उत्तम डिझाईन तयार करण्यात आले आहे. चाळकऱयांनी इतकी वर्ष दु:ख अनुभवले. आता तुमच्या पुढच्या पिढीच्या चेहऱयावरील आनंद पाहायचा आहे. बीडीडी चाळी या मुंबईच्या इतिहासाचा भाग आहे. येथील तीन पिढय़ांनी दु:ख भोगले. परंतु, आता हे दु:ख लवकरच दूर होऊन चाळकऱयांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

या कार्यक्रमाला मुंबई शहरचे पालकमंत्री सुभाष देसाई, उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री रवींद्र वायकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, कालिदास कोळंबकर तसेच गृहनिर्माण आणि म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते.

Related posts: