|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » इंद्रियाची क्रियाशीलता आणि रुप बदलणारी प्लास्टिक सर्जरी

इंद्रियाची क्रियाशीलता आणि रुप बदलणारी प्लास्टिक सर्जरी 

जन्मजात इंद्रियांचे व्यंग, कर्करोग, जळणे, अपघात, जंतुसंसर्ग आदींनी बिघडलेल्या इंद्रियाला तंतोतंत घडवणे किंवा भासमान पुनर्रचना करणे यासाठी प्लास्टिक सर्जरी सर्वमान्य होत आहे. प्लास्टिक सर्जनच्या शल्यचिकित्सेने तो रुग्ण आनंदाने जीवन जगू लागतो. प्लास्टिक सर्जरीच्या स्थित्यंतरातील टप्पे, संशोधने आणि आता अत्याधुनिक काळातील प्लास्टिक सर्जरी यावर डॉ. रविन थत्ते यांनी प्रकाश टाकला. दहा आंतरराष्ट्रीय सन्मान चिन्हे, सहा राष्ट्रीय सन्मान चिन्हे आणि वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही लिलया वावर असलेले अभ्यासक डॉ. थत्ते यांनी प्लास्टिक सर्जरी भविष्यातही मानवाला हितावह ठरेल असे सांगितले.

@ अत्याधुनिक प्लास्टिक सर्जरीचे मूळ भारतीय आहे का?

इसवी सन 2000 वर्षापूर्वी गुन्हय़ांसाठी कठोर शिक्षा केल्या जात असत. यात विद्रुपीकरण अधिक केले जात असे. जसे कान, नाक कापण्याच्या शिक्षा असत. या शिक्षा भोगून झाल्यानंतर काही काळाने शिक्षा भोगलेल्या लोकांना पुन्हा आपले कापलेले कान-नाक दुरुस्त करावेत असे वाटत असे. हे अवयव पूर्ववत करण्यासाठी शल्यचिकित्सक सुश्रुत याने संशोधनाला सुरुवात केली. त्यांनी केलेल्या संशोधित शस्त्रक्रियांची संस्कृतमध्ये वर्णने केली. तशा शस्त्रक्रियाही केल्या. मात्र, त्यानंतर दोन हजार वर्ष हे शास्त्र अस्तंगत झाले. कालांतराने हे भारतीय शास्त्र अरबस्थानात गेले. तिथून युरोप मार्गे इंग्लंडमध्ये गेले. इंग्लंडमधून अमेरिकेत गेले. या शास्त्राचा असा हा प्रवास गेल्या 300 वर्षात घडलेला आहे. मात्र, या शास्त्राचे मूळ भारतीय आहे.

@ प्लास्टिक सर्जरीचे ज्ञान मूळ भारतीय असल्याचे जगाने कबूल केले आहे का?

हो. प्लास्टिक सर्जरीचे मूळ भारतीय शल्यचिकित्सेमध्ये असल्याचे विश्वाने कबूल केले आहे. शल्यचिकित्सक सुश्रुताने प्रत्येक शल्यचिकित्सेवेळी उपयोगी पडणारी नवीन पन्नास उपकरणे शोधून काढली. त्या उपकरणांच्या आकृत्या ग्रंथांमध्ये आहेत. मुळात प्लास्टिक सर्जरी हे ज्ञान भारतीय असल्याचेच पाश्चिमात्यांनीच ठासून सांगितले आहे.

@ अर्वाचिन ते आधुनिक प्लास्टिक सर्जरीचा प्रवास कसा घडला?

याला कारण दोन्ही जागतिक युद्ध ठरले. दोन महायुद्धांची कारणे आधुनिकतेकडे नेण्यास कारणीभूत ठरली. पहिल्या आणि दुसऱयाही महायुद्धात सर्वच सैनिकांना शरिरावर भयंकर इजा झाल्या होत्या. यात विद्रुपीकरणापासून अपंगत्वापर्यंत सर्व काही होते. त्यावेळी शल्यचिकित्सा शास्त्राने पुन्हा उचल खाल्ली. विद्रुप, जायबंदी आणि जखमींना बरे करण्याची गरज निर्माण झाली. यात अस्थिव्यंग तज्ञ आणि शल्यचिकित्सक यांची जोडी जमली. अस्थिव्यंग चिकित्सकाने हाडे नीट करायची आणि शल्यचिकित्सकाने व्यंग दुरुस्त करायचे. या दोघांच्या भागीदारीत त्या शस्त्रक्रियेच्या पद्धतीला पुन्हा चालना मिळाली.

@ प्लास्टिक सर्जरीची निकड कशी होऊ लागली?

व्यंगामुळे नुसतेच मानसिक किंवा तेवढय़ापुरते शारीरिक परिणाम होत. किंवा इतर तऱहेने कार्यक्षमता कमी होऊ शकते. जन्मत: दुभंगलेला ओठ आणि टाळू या विकृतीत दातावर दात बसत नाहीत. चावणे अवघड होते. द्रवपदार्थ नाकावाटे वाहतात. नाकाचे कार्य बिघडते. गिळायला त्रास होऊ शकतो. तोंडात वायू बंदिस्त करता येत नाही. त्यामुळे वाचेची फेक सदोष आणि गेंगणी होते. टाळूच्या मागचा घसा आणि कानाची पोकळी यात एका सूक्ष्म छिद्रातून संबंध असतो. टाळू उघडा राहिला तर त्या छिद्रातून कानात जंतूप्रवेश होतो, मग पू होतो, कान फुटतो. तेव्हा कानाचा पडदा निकामी होऊन बहिरेपण येते. अशा काही प्रकरणांमध्ये प्लास्टिक सर्जरी अत्यंत गंभीर गरज होते.

@ आधुनिक शल्यचिकित्सक आणि प्लास्टिक सर्जन यातील फरक काय?

wwपूर्वीच्या काळात प्लास्टिक सर्जन नव्हते. जे होते ते साधे शल्यचिकित्सक होते. तंतोतंत किंवा हुबेहूब अवयव, त्वचा निर्माण करण्यासाठी लागणाऱया गरजेतून संशोधनाला सुरुवात झाली. एखादे व्यंग दुरुस्त करताना त्याला लागणारे दृश्यस्वरुप परिमाण मनात आकारू लागली. तंतोतंत आणि नैसर्गिक देणाऱया शल्यचिकित्सकास प्लास्टिकॉस म्हणू लागले. प्लास्टिकॉस हा लॅटीन शब्द असून त्याचा अर्थ आकार देणे असा आहे. एखाद्यावेळी डोळे नीट उघडत नसतील तर काही सर्जनने प्लास्टिकॉस सर्जरीचे तत्त्व अवलंबून सर्जरी करण्यास सुरुवात झाली. प्लास्टिकॉस शल्यचिकित्सेमध्ये वाकडे नाक सरळ करणे, दुभंगलेल्या उटाळूची शस्त्रक्रिया हे प्रकार होऊ लागले. पुढे आधुनिक प्लास्टिक सर्जरा विकसित होत गेली.

@ आधुनिक प्लास्टिक सर्जरी म्हणजे त्वचेचे लेपन म्हणता येईल का?

बऱयापैकी तसे म्हणता येईल. प्लास्टिक सर्जरीमध्ये गरजू व्यक्तींच्या त्वचेचाच  वापर केला जातो. शरिराच्या ज्या भागावर सर्जरी करायची असते, त्या अवयवाशी साधारणपणे साधर्म्य असलेल्या अवयवाखालची त्वचा काढून घेतली जाते.  उदाहरणच द्यायचे झाल्यास मांडीकडील सर्जरी करताना पाठीवरील त्वचा वापरली जाते. कारण या दोन्ही त्वचेत बऱयापैकी साधर्म्य असते. मात्र, चेहऱयावरील एखाद्या व्रणासाठी कानामागील त्वचेचा विचार केला जातो. या दोन्ही त्वचेत साधर्म्य असते.  चेहऱयावरील त्वचेप्रमाणे पातळ असते.

@ सौंदर्यप्रसाधन होत असलेल्या प्लास्टिक सर्जरींबाबत तुमचं मत काय?

प्लास्टिक सर्जरीची जादूच अशी आहे की ते व्यंग दूर करते. निदान इंद्रियांमध्ये भासमान निर्माण करते. सामाजिक वर्गात जशी जशी आर्थिक स्थिती बदलू लागते. तसतसे भारतीयांनीही पाश्चिमात्यांच्या अनुकरणास सुरुवात केली. आपण कसे सुंदर दिसू या हव्यासापोटी अपेक्षा वाढू लागल्या. सौंदर्य प्रसाधक शस्त्रक्रियांमध्ये मोडू लागल्या आहेत. वयोमानापरत्चे बदलणारे घटक सहजतेने आणि आनंदाने स्वीकाराव्यात यातच स्वारस्य आहे असे मला वाटते.

@ आधुनिक प्लास्टिक सर्जरीचे भविष्य काय?

प्लास्टिक सर्जरीमध्ये प्लास्टिकचा वापर होत नाही. शरिरातीलच पेशी-ऊतींचा वापर होऊन इंद्रिय दुरुस्त केली जातात. आता संशोधनातून तंत्रज्ञान वाढत आहे. ऊती बदलणे हाच प्लास्टिक सर्जरीचा मुख्य भाग आहे. रुग्णाच्या शरिरातील ऊतींचा वापर करून प्लास्टिक सर्जरी केली जाते. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाने पेशी शरिराच्या बाहेर काढून ऊती तयार होऊ लागल्या आहेत. प्रयोगशाळेत ऊतींचा वापर करून मानवी पेशी निर्मितीचा प्रयोग सुरू आहे. स्नायू पुच्छांची (टेंडन) आणि कुर्चा (कार्टीलेज) निर्मितीही होऊ शकते.