|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जन्मशताब्दी समारोह समिती अध्यक्षपदी डॉ.सुभाष दिघे

जन्मशताब्दी समारोह समिती अध्यक्षपदी डॉ.सुभाष दिघे 

मालवण : भाजपच्यावतीने देशभर पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त गरीब कल्याण वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त 25 मे ते 10 जून या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 100 पंचायत समिती मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी समारोह समिती स्थापन करण्यात आली आहे. अध्यक्षपदी डॉ. सुभाष दिघे यांची निवड करण्यात आली आहे.

25 मेपासून पंचायत समिती मतदारसंघात भाजपचा एक पदाधिकारी पंधरा दिवस त्या ठिकाणी राहून त्या मतदारसंघाचा विकास आराखडा बनवून सर्वसामान्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली.

येथील भाजप तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जठार बोलत होते. पंधरा दिवसांचे अभियान हे देशस्तरावरही राबविण्यात येणार आहे. यात भाजप पदाधिकारी हा एक विस्तारक म्हणून पंचायत समिती मतदारसंघात राहणार आहे. सिंधुदुर्गातील 100 पंचायत समिती आणि नगरपालिका व नगरपंचायत यांच्यासाठी 165 पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच जनतेच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. भारतातील प्रत्येक घरापर्यंत भाजप कार्यकर्ता पोहोचविण्याच्या दृष्टीने हे अभियान राबविण्यात येणार आहे, असेही जठार म्हणाले.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, शहर अध्यक्ष बबलू राऊत, आरोग्य सभापती आप्पा लुडबे, नगरसेवक गणेश कुशे, पूजा करलकर, विलास हडकर, भाऊ सामंत, दादा वाघ तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी समारोह समितीत सहसंयोजक म्हणून प्रमोद रावराणे, प्रभाकर सावंत, सदस्य म्हणून प्रमोद जठार, राजन तेली, ऍड. अजित गोगटे, संदेश पारकर, डॉ. प्रसाद देवधर, नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सभापती जयश्री आडिवरेकर, सभापती लक्ष्मण रावराणे, उपसभापती स्मिता दामले, नगरसेविका राजश्री धुमाळे, जि. प. सदस्य राजन म्हापसेकर, विलास हडकर यांचा समावेश आहे. या समितीबरोबरच आणखी एक कार्यविस्तार समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याच्या संयोजकपदी अतुल काळसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही जठार यांनी स्पष्ट केले.