|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमेरिकेवर मोठा हल्ला करण्याची अखेरची इच्छा!

अमेरिकेवर मोठा हल्ला करण्याची अखेरची इच्छा! 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अफगाणिस्तानसह अन्य देशांमध्ये दहशतवादी कृत्यांनी धुमाकूळ घातलेल्या अल कायदा या संघटनेचा म्होरक्या आयमन अल जवाहिरी हा अद्याप जिवंत असून त्याला अमेरिकेमध्ये मोठा हल्ला घडवून आणायचा असल्याचे वृत्त न्यूजवीकने प्रसारित केले. या वृत्ताने भारतासह अल कायदाचा फटका बसलेल्या देशांना धक्का बसला आहे.

गेल्या वर्षी अमेरिकेने अफगाण सीमेवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात तो मारला गेल्याचे म्हटले जात होते. परंतु या हल्ल्यातून जवाहिरी बचवला होता. त्यानंतर त्याला पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआयने आश्रय दिल्याचे आणि तो कराचीमध्येच असल्याचे न्यूज वीकच्या वृत्ताने स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, सीआयएचे माजी अधिकारी ब्रूस रिडेल्स यांनीही या वृत्ताला पुष्टी दिली असून जवाहिरीला पाकिस्ताननेच आसरा दिला आहे. तो सध्या कराचीमध्ये असावा. ओसामा लादेनला मारलेल्या ठिकाणीच ऍबोटाबाद येथे काही पुरावे हाती लागल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

जवाहिरी हा मूळचा इजिप्तमधील असून तो डॉक्टरी पेशातील आहे. मात्र अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये तो गुंतला असून अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्याही आहे. 2001 पासून त्याला आयएसआयने संरक्षण दिले असल्याचेही या वृत्तामध्ये म्हटले आहे. त्यावेळी अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यात त्याला आणि त्याच्या संघटनेला तेथून हुसकून लावले होते. त्यानंतर जवाहिरीने पाकिस्तानात आसरा घेतला होता.

अमेरिकेच्या सीआयएचे माजी अधिकारी ब्रूस रिडेल्स यांनीही जवाहिरी जिवंत असल्याचा आणि त्याने पाकिस्तानात आसरा घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या वर्षी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी जवाहिरीला लक्ष्य करत केलेल्या ड्रोन हल्ल्यामधूनही तो वाचला होता. त्यानंतर त्याने लपण्यासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून कराचीच निवड केली असून तो तेथेच लपून बसला असावा. या ड्रोन हल्ल्यात त्याचे पाच सुरक्षा रक्षक मृत्युमुखी पडले होते. याबाबत एका दहशतवाद्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जवाहिरी हा हल्ला झाला त्याच्या पुढील खोलीतच होता. मात्र स्फोटानंतर तो किरकोळ जखमी झाला होता, अशी माहिती प्राप्त झाल्याचे रिडेल्स यांनी म्हटले आहे. तसेच अमेरिकेवर मोठा हल्ला घडवून आणण्याची त्याची इच्छा असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.