|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भूलतज्ञांच्या बदल्यांना स्थानिकांचा विरोध

भूलतज्ञांच्या बदल्यांना स्थानिकांचा विरोध 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

दापोलीचे भूलतज्ञ डॉ.रामचंद्र लवटे आणि वाटदचे भूलतज्ञ डॉ.केशव गुट्टे यांची बदलीची ऑर्डर जिल्हा शासकीय रूग्णालयात काढण्यात आल्याने तेथील स्थानिक नागरिकांमधून नाराजींचे सूर उमटत आहेत. या दोन्ही तज्ञांनी स्थानिक पातळीवर उत्तम सेवा दिली होती. त्यामुळे स्थानिकांना हेच तज्ञ हवे आहेत. हे दोन्ही तज्ञ सध्या आजारी पडल्याने तेथील नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात एकही भूलतज्ञ नसल्याने शस्त्रक्रिया रखडल्या जात आहेत. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. सेवानिवृत्त तज्ञ डॉ.काजवे यांच्या सहकार्याने आतापर्यंतच्या शस्त्रक्रिया केल्या असून अद्यापही त्यांच्यावर सिव्हील अवलंबून आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक आमदारांनी पाठपुरावा केला आणि आरोग्य खात्याने वाटद येथे अनेक वर्षापासून सेवा बजावणारे डॉ.केशव गुट्टे यांची नियुक्ती सिव्हीलमध्ये करण्यात आली. मात्र अद्यापही डॉ.गुट्टे हजर झाले नाहीत. म्हणून दापोलीचे तज्ञ डॉ.रामचंद्र लवटे यांची नियुक्ती सिव्हीलला झाली, मात्र ते ही आजारी पडल्याने हजर झाले नाहीत.

डॉ.केशव गुट्टे आणि डॉ.रामचंद्र लवटे या दोघांनी संबंधित ठिकाणी अतिशय उत्तम सेवा बजावल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून दिली जात आहे. या भूलतज्ञांच्या राजकारणात आमचे चांगले डॉक्टर गेले. गावात सध्या एकही शासकीय वैद्यकीय अधिकारी नाही. सध्या तात्पुरत्या स्वरूपात दुसरे डॉक्टर येतात, मात्र डॉ.केशव गुट्टे हे वाटदमध्ये रात्री-अपरात्री कधीही त्यांना बोलावले तरी रूग्णांच्या मदतीला धावून यायचे. 8 तासाची डय़ुटी न करता 24 तास जागरूक राहून त्यांनी वाटद पंचक्रोशीत खूपच चांगली सेवा दिली आहे. त्यांची बदली सिव्हीलला करण्याऐवजी दुसऱया नियुक्त्या करायला हव्या होत्या, अशी प्रतिक्रिया वाटदचे सामाजिक कार्यकर्ते भाई जाधव यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.

डॉ.रामचंद्र लवटे यांची बदली झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयाला निवेदन दिले असून या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत: आमदार संजय कदम उपोषण छेडणार असल्याचीही माहितीही पुढे आली आहे. डॉ.लवटे यांनी दापोलीत उत्तम सेवा दिली असून त्यांची दापोलीला गरज असताना पुन्हा सिव्हीलला नियुक्ती करणे चुकीचे आहे. दुसरा पर्यायी वैद्यकीय अधिकारी मिळाला नाही का? शेवटी दापोलीतील नागरिकांनाही सेवा मिळाली पाहिजे तसेच रत्नागिरीतील नागरिकांनाही यातून आरोग्यमंत्र्यांनी पर्याय काढला पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे.

एकीकडे हे सर्व आरोप-प्रत्यारोप सुरू असताना डॉ.केशव गुट्टे आणि डॉ.रामचंद्र लवटे हे दोघेही एकाचेवळी आजारी पडले आहेत. नेमके काय करावे, या व्दिधा मनस्थितीत हे दोघेही असल्याने आजारी पडल्याचेही बोलले जात आहे. आता सोमवारी नेमके कोणते तज्ञ सिव्हीलमध्ये रूग्णांच्या सेवेसाठी दाखल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related posts: