|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शनिवारपासून मीटर डाऊनच्या कारवाईस प्रारंभ

शनिवारपासून मीटर डाऊनच्या कारवाईस प्रारंभ 

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव शहरात शनिवारपासून ऑटोरिक्षा मीटर डाऊन झाले आहेत. सध्या तरी किमान 80 टक्के रिक्षांमध्ये मीटरची अंमलबजावणी सुरु झाली आहे. दरम्यान प्रशासनाकडून सक्तीच्या अंमबजावणीत सातत्य असणे गरजेचे आहे. 100 क्रमांकावर तक्रार करणाऱयांना यापूर्वी पोलिसी दुर्लक्षाचा अनुभव आला असून प्रवाशांच्या तक्रारींची तातडीने व गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. रहदारी पोलिसांनी शिस्त लागेपर्यंत सततची तपासणी मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ऑटोरिक्षांमध्ये मीटरची सक्ती आणि तिची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. जिल्हाधिकाऱयांनी व्यापक बैठक घेऊन अंमलबजावणीसाठीचे आदेश दिल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या सूचनेवरुन  शनिवार दि. 22 पासून ही अंमलबजावणी सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी रहदारी पोलिसांच्या कारवाईचा धडाका पहावयास मिळाला. दंडाची रक्कम हजारोच्या घरात जाऊन पोहोचत होती. यामुळे कधी नव्हे ते बेळगाव शहरात मीटरसक्तीच्या बाबतीत सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. काही अपवाद वगळता जास्तीत जास्त रिक्षांमध्ये चालू स्थितीतील मीटर्स दिसू लागले असून त्यांचा वापरही सुरु झाला आहे. 

रिक्षा चालकांत धास्तीचे वातावरण

बेळगावच्या रिक्षा व्यवसायाला शिस्त लावण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सध्या तरी जोरात सुरु आहेत. रहदारी पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी तसेच इतर अधिकारी वर्गाने 24 तास लक्ष घालून मीटर डाऊनसाठी प्रयत्न चालविले आहेत. सध्या 100 क्रमांकावर होणाऱया तक्रारींकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत असताना या दोन्ही अधिकाऱयांनी त्या तक्रारींकडेही गांभीर्याने पाहण्यात येईल, असे सांगून थोडे उशीरा का होईना कारवाई करण्याकडे लक्ष दिले आहे. यामुळे रिक्षा चालकांत धास्तीचे वातावरण आहे.

22 एप्रिलपासून सुरु झालेली धडक मोहीम लवकर थांबली जाऊ नये. त्यामध्ये सातत्य रहावे, यासाठी रहदारी पोलिसांना या कामासाठी मोकळीक देण्याची गरज आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन मीटर डाऊनचे स्वप्न पूर्णपणे साकारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी वाढली आहे. 

प्रिपेडकडेही लक्ष

शनिवारी सकाळपासूनच ठिकठिकाणी पथके स्थापून कारवाई करण्याबरोबरच शहरातील प्रिपेड ऑटोरिक्षा स्थानकांवर योग्य कार्यवाही होण्याच्या दृष्टिनेही प्रशासनाने लक्ष वेधले आहे. मोठा गाजावाजा करुन शहराच्या तीन वेगवेगळय़ा भागात सुरु करण्यात आलेली प्रिपेड ऑटोरिक्षा केंदे कुचकामी ठरली होती. शहरात मीटरप्रमाणे भाडे आकारणी होत नाही. अशात प्रिपेड केंद्रांवर प्रवासी जाऊन पोहोचत नाहीत. यामुळे या केंद्रांची अवस्था बिकट बनली असून आरटीओ विभागाचा निष्क्रिय कारभार त्यास कारणीभूत ठरला होता. यावर तरुण भारतने आवाज उठविल्यानंतर शनिवारी रहदारी पोलीस रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बस स्थानक तसेच रामदेवनजीकच्या प्रिपेड केंद्रावर दाखल झाले होते.

Related posts: