|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा हे इतर राज्यांबरोबर सलोखा जपणारे राज्य

गोवा हे इतर राज्यांबरोबर सलोखा जपणारे राज्य 

 

प्रतिनिधी/ डिचोली

गेल्या अनेक वर्षांपासून गोव्यात वास्तव्यास असलेल्या कर्नाटक राज्यातील लोकांना गोमंतकीयांनी आज आपलेसे केलेले आहे. येथे राहायला येणाऱया बाहेरील राज्यातील लोकांना कधीच गोमंतकीयांनी त्रास दिलेला नाही. म्हणूनच गोवा हे जातीय व धार्मिक सलोख्या बरोबरच इतर राज्यांबरोबर मैत्री व सलोखा जपणारे राज्य आहे. गोव्याने सामाजिक व सांस्कृतिक सलोखाही मोठय़ा आत्मियतेने जपलेला आहे, असे प्रतिपादन सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली येथे केले.

डिचोली येथील कर्मभूमी कन्नड संघाच्या तिसऱया वर्धापनदिन सोहळ्य़ात सभापती डॉ. सावंत बोलत होते. व्यासपीठावर डिचोलीचे आमदार तथा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष राजेश पाटणेकर, मयेचे आमदार तथा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रविण झांटये, डिचोलीचे उपनगराध्यक्ष अजित बिर्जे, नगरसेवक निसार शेख, मेधा बोर्डेकर, कमलेश तेली, कर्नाटकचे अन्न व नागरी पुरवठामंत्री यु. टी. खदार, विजयपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निलम्मा मेटी, गोवा कन्नड संघाचे अध्यक्ष सिद्धन्ना मेटी, विरेश नागोजी, नलवार – गुलबर्गा येथील स्वामी डॉ. सिद्धाटाटेंद्र शिवाचार्य महास्वामी व हिरेमठ हुकेरी येथील ब्रह्म श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी आदींची उपस्थिती होती.

आमदार प्रविण झांटये म्हणाले की, गोव्यात स्थायिक झालेल्या कर्नाटकातील लोकांनी आज आपले वेगळे स्थान येथे निर्माण केलेले आहे. गोव्याच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कर्नाटकच्या लोकांनी आपला सहभाग सदैव दाखविला आहे व या लोकांमुळेच आज गोव्यतील लोकांना अनेक कामांमध्ये आधार मिळतो.

आमदार राजेश पाटणेकर म्हणाले की, गोव्यातील सर्व कामांत आज कर्नाटकच्या लोकांनी भरारी मारलेली आहे. त्यामुळे गोव्याच्या विकासात अप्रत्यक्षपणे या लोकांचेही योगदान आहेच. येथील प्रत्येक सण, उत्सवांमध्येही कर्नाटकचे लोक आपला सहभाग दाखवून त्यांनी आज गोव्याच्या सर्व संस्कृती परंपरेला आपलेसे केलेले आहे.

सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते वर्धापनदिन सोहळ्य़ाचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी 201 कलश घेऊन महिलांनी डिचोली शहरात मिरवणूक काढली. ही मिरवणूक गावकरवाडा येथील शांतादुर्गा मंदिराकडून सुरु करण्यात आली होती. त्यानंतर कर्नाटकमधील कला, परंपरेचे दर्शन घडविण्यात आले तसेच कार्यक्रमस्थळी विविध नृत्याविष्कारांचे दर्शन घडविण्यात आले. स्वागत महेशबाबू सुर्वे यांनी केले. सूत्रसंचालन भरतेश गुळनवर यांनी केले. या सोहळ्य़ानंतर दिवसभर कर्नाटकी संस्कृतीती विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.

Related posts: