|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सावरकरची खरी ओळख लपविण्याचे मोठे षड्यंत्र

सावरकरची खरी ओळख लपविण्याचे मोठे षड्यंत्र 

सावरकर व्याख्यानमालेत डॉ. जयंत कुलकर्णी यांचे मत

प्रतिनिधी / वाळपई

सावरकरांनी आपल्या देशाला स्वाभिमानाने व स्वतंत्र विचारांनी जगण्याचा मंत्र दिला बालवयातच देशाला स्वतंत्र मिळण्याची विचारधारा आत्मसात करून इतरांनाही प्रोत्साहित करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले होते. त्यांचे विचार आजही सर्वांना प्रेरणा देणारे आहे. मात्र खरे सावरकर आजही समाजासमोर आलेले नाहीत ही शोकांतिका आहे. सावरकरांचा इतिहास प्रकर्षाने पुढे आणण्याऐवजी लपून राहावा यासाठीच काही राजकीय पक्षांनी सावरकर विरोधकांना हाताशी धरून त्यांचा इतिहास जगासमोर न आणण्याचे कर्मकांड केले आहे. तरीसुद्धा वाळपईसारख्या ग्रामीण भागात सावरकरांना समजून घेण्यासाठी व्याख्यानमालेसारखे कार्यक्रम आयोजित होतात व त्यास नागरिक भरभरून प्रतिसाद देतात हे खरोखरच वाखणण्याजोगे आहे, असे प्रतिपादन पुणे येथील डॉ. जयंत कुलकर्णी यांनी केले.

गोमंतक मराठी अकादमी सत्तरी विभाग व वाळपई सम्राट क्लब आयोजित सावरकर व्याख्यानमालेतील ’सावरकर एक धगधगते अग्निकुंड’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.

वाळपई वनप्रशिक्षण सभागृहात आयोजित या व्याख्यानमालेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पुढे बोलताना डॉ. कुलकर्णी यांनी सावरकर यांच्या जीवनाचे विविध पैलू उपस्थितांसमोर मांडले. आपल्या देशावर भरभरून प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे सावरकर होते. परदेशात असताना त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कामगिरीमुळे दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागली. भारताला स्वातंत्र्याचा उदय पाहण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनेचा विचार त्यांनी अनेकवेळा मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अनेकांना पचला नाही. कारण हिंदुत्व हे आजही अनेकांना विषासारखे वाटत आहे. म्हणूनच सावरकरांशी संबंधित कार्यक्रमावर काँग्रेस, कम्युनिष्ट यासारखे राजकीय पक्ष बहिष्कार घालतात ही खरोखरच दुर्दैवी बाब आहे.

सावरकरांची खरी ओळख आज गोवा व महाराष्ट्र आदी राज्याव्यतिरिक्त कोणत्याही राज्यांना नाही. कारण यामागे मोठे षड्यंत्र दडलेले आहे. भारताला स्वातंत्र्याची गोडी निर्माण करणाऱया थोर व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्यापेक्षा आपली शिक्षणपद्धती इतिहास शिकवण्याच्या नावाखाली परकीयांच्या इतिहासाची थोरवी नवीन पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी अश्या स्वरुपाच्या व्याख्यानमाला आयोजित करण्याची गरज आहे, असे डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले.

याप्रसंगी व्यासपीठावर गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, गोमंतक मराठी अकादमी सत्तरी विभाग प्रमुख नरहरी हळदणकर, वाळपई सम्राट क्लबचे अध्यक्ष संजय हळदणकर, माजी अध्यक्ष नंदा माजिक, आनंद मयेकर, भाग्यरेखा गांवस, विजय नाईक, आदींची उपस्थिती होती. सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प नारायणबुवा बर्वे यांच्याहस्ते व्याखानमालेचे उद्घाटन करण्यात आले.

त्यावेळी बोलताना श्री. सामंत यांनी गोमंतकातील तरुण मनाना विविध उपक्रमाद्वारे जागे करणे व त्यांना योग्य व्यासपीठाद्वारे प्रतिभेला वाव देण्याचा प्रयत्न करीत आहे. मराठी अकादमीच्या माध्यमातून आपणास वेगळा समाज निर्माण करण्यासाठी विचारधारा रुजविण्याची काळाजी गरज आहे, असे मत व्यक्त केले. नारायण बर्वे याचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन प्रकाश गाडगीळ यांनी केले. शिवाजी देसाई यांनी सर्वांची ओळख करून दिली.

Related posts: