|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रुपा शहा म्हणजे संघर्षमयी जीवन प्रवास

रुपा शहा म्हणजे संघर्षमयी जीवन प्रवास 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

रुपा शहा यांनी नेहमी प्रवाहाच्या विरोधात जाणे पसंत केले. त्यांनी अन्याय, असमानता, अनिष्ठ प्रथांच्या विरोधात आवाज उठवला. त्यांचे सारे जीवन म्हणजे एक संघर्षमयी प्रवास आहे. असे प्रतिपादन केंद्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.माणिकरान साळुंखे यांनी केले. रविवारी त्यांच्या हस्ते प्रा.डॉ.रुपा शहा यांच्या ‘लेखाजोखा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. नष्टे लॉन येथे हा प्रकाशन सोहळा झाला.

   राष्ट्रीय छात्र सेना, दिलासा संस्था यांच्या माध्यमातून प्रा.डॉ.रुपा शहा गेली तीन दशके सामाजिक जीवनात कार्यरत आहेत. आपल्या अनुभवांवर त्यांनी लिहिलेल्या ‘लेखाजोखा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कर्नल (निवृत्त) दिलीप  थोरात, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात, शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, जीतो संघटनेचे अध्यक्ष नेमचंद संघवी यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश शहा  यांनी केले.

   पुस्तकाचा उद्देशाबद्दल डॉ.शहा म्हणाल्या, ‘काळ बदला असला तरी परिस्थिती तशीच असते. प्रश्न तेच असतात. बालविवाह रोखण्यासाठी मी चळवळ उभी केली. लहान मुलींचे विवाह मांडवात जावून थांबवले. त्यामुळे ‘लग्न मोडणारी बाई’ अशी माझी ओळख बनली. परवा जिल्हा पोलीस प्रमुखांनी बालविवाह रोखल्याची बातमी आपण वाचली. म्हणजे अजूनही प्रश्न तेच आहेत. कदाचीत त्यांचे स्वरुप बदलले असेल. या सामाजिक प्रश्नांवर, सहकार क्षेत्रावर, शिक्षण व्यवस्थेवर मी अत्तपार्यंत 97 शोध निबंध लिहीले आहेत. त्यातील 32 निबंध घेऊन मी हे पुस्तक लिहीले आहे. सामाजिक स्वास्थ टिकून रहावे यासाठी शासन विविध योजना बनवते पण समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. यासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणाऱया संस्थांना आणि व्यक्तींना शासनाने पाठबळ द्यावे.’

    सिद्धार्थ खरात म्हणाले, ‘उच्च शिक्षीत लोकांची संख्या पुष्कळ आहे. सर्वच उच्चशिक्षीत सामाजिक प्रश्नांवर कृतिशील भूमीका घेत नाहीत. मात्र शहा यांनी प्रत्यक्ष समाजात उतरून सामाजिक प्रश्नांवर लढा दिला. स्त्रीयांच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा जोतीबा फुले यांनी चळवळ उभी केली. रुपा शहा यांचे कार्य याच चळवळीचा एक भाग आहे.’ डॉ.सुवर्णा खरात म्हणाल्या, ‘पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांचे वर्चस्व सहन केले जात नाही. त्यामुळे आजही समाजात असमानता दिसून येते. या असमानेविरोधात रुपा शहा यांनी नेहमीच संघर्ष केला आहे. मात्र हा संघर्ष स्वतःसाठी नसून समाजासाठी आहे. त्यांनी 13 पदव्या संपादन केल्या मात्र शिक्षणाला मिरवण्याचे नव्हे तर ज्ञानार्जनाचे साधन मानले.’

  अध्यक्षीय भाषण करताना डॉ.माणिकराव साळुंखे म्हणाले, ‘रुपा शहा आणि माझी ओखळ त्यांच्या विद्यार्थीदशेपासून आहे. त्या नेहमीच उत्साही आणि काम करण्यास तत्पर राहील्या आहेत. विद्यापीठाच्या सिनेटमध्येही त्यांनी विविध शैक्षणिक प्रश्नांवर आग्रही भूमीका मांडली. त्यांच्या मनाला जे पटते ते त्या करतात. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यापासून ते सामाजिक प्रश्नांवर आंदोलन करण्यापर्यंत सर्व बाबतीत त्यांना संघर्ष करावा लागला. मात्र हा संघर्ष स्वतःसाठी नव्हता तर समाजासाठी होता. त्या नेहमी प्रवाहाच्या विरोधात गेल्या. त्यांचे जीवन म्हणजे एक संघर्षमयी प्रवास आहे.

  पुस्तकाबद्दल डॉ.साळुंखे म्हणाले, लेखाजोखा पुस्तकामध्ये सामाजिक, आर्थिक, पर्यावर्णीय प्रश्नांवर अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे. या प्रश्नांचे जूने संदर्भही त्यांनी लिखाणातून दिले आहेत. एका अर्थाने त्यांनी वर्तमान आणि भविष्याचा वेध घेतला आहे. या पुस्तकातून त्यांनी विकास या संकल्पनेची सूत्रबद्ध मांडणी केली आहे.

  या प्रसंगी कर्नल दिलीप थोरात, शहा यांच्या भगिनी वर्षा आणि शैला, भाऊसाहेब खराडे यांनी मनोगत व्यक्त केले. 

 

Related posts: