|Thursday, December 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » पेगी विट्सन यांचे अंतराळात विक्रमी वास्तव्य

पेगी विट्सन यांचे अंतराळात विक्रमी वास्तव्य 

ट्रम्प यांच्याकडून व्हाइट हाउस भेटीचे आमंत्रण

वृत्तसंस्था /  वॉशिंग्टन

नासाच्या अंतराळवीर पेगी विट्सन यांनी अंतराळात सर्वाधिक काळ वास्तव्य करण्याचा विक्रम केला आहे. कोणत्याही महिलेकडून अंतराळात सर्वाधिक वास्तव्याचा विक्रम आधीच त्यांच्या नावावर होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची (आयएसएस) धुरा दोनदा सांभाळणाऱया पहिल्या महिला देखील त्याच आहेत. आता त्यांनी 534 दिवसांपर्यंत अंतराळात वास्तव्याचा जेफ विलियम्स यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

विट्सन यांच्या या कामगिरीनिमित्त अभिनंदन करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची कन्या इवांकाने त्यांनी व्हाइट हाउसचे आमंत्रण देत त्यांची भेट घेतली आहे.

चालू महिन्यात अंतराळवीर शेन किमब्रो यांनी आयएसएसची जबाबदारी पेगी यांना सोपविली होती. आता त्या आणखी एक विक्रम स्थापित करतील, दोनवेळा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची धुरा सांभाळणाऱया त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. पेगी यांच्या रुपात अंतराळ स्थानक योग्य हातांमध्ये असल्याचे उद्गार त्यावेळी किमब्रो यांनी काढले होते.

पेगी अंतराळात जाणाऱया सर्वाधिक वयाच्या महिला असून सध्या त्यांचे वय 57 वर्षे आहे. डॉ. पेगी विट्सन या जैवरसायन शास्त्राच्या पदवीधर आहेत. 1996 साली अंतराळवीर म्हणून निवड होण्यापूर्वी नासाच्या अनेक महत्त्वपूर्ण पदांवर त्या कार्यरत होत्या. 2002 साली त्या पहिल्यांदा अंतराळात गेल्या आणि 2007 साली आयएसएसचे नेतृत्व करणाऱया पहिल्या महिला ठरल्या होत्या.

Related posts: