|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सोनशीत प्रदुषणाची बाल हक्क आयोगाकडून दखल

सोनशीत प्रदुषणाची बाल हक्क आयोगाकडून दखल 

प्रतिनिधी/ वाळपई

सोनशीतील ग्रामस्थांनी खनिज वाहतुकीमुळे होणाऱया समस्या सोडविणे व विविध मागण्यांसाठी केलेल्या तीव्र आंदोलनाची बाल हक्क आयोगाने दखल घेतली आहे. गावातील परिस्थितीचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्यासाठी आयोगाच्या सभासदांनी नुकतीच सोनशी गावाला भेट दिली. या भेटीत त्यांनी अनेक मुलांशी मनमोकळेपणाने संवाद साधून विविध समस्या जाणून घेतल्या. यात हवा, पाणी, धूळ प्रदूषणामुळे येथील मुलांवर होणाऱया परिणांमाचा मुद्दा प्रामुख्याने समोर आला आहे.

सेसा गावा खाण कंपनीने सोनशी गावातून खनिज मालाची वाहतूक करताना ग्रामस्थांना सतावणाऱया समस्यांकडे सतत दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी 8 एप्रिलपासून आंदोलनास सुरुवात केली. 11 रोजी रस्तारोका केल्याने ग्रामस्थांना अटक करुन सरकारने न्यायालयीन कोठडीतही पाठविले. त्याचा वेगळा परिणाम होत विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. गावातील महिला, मुलांनी वेगवेगळ्य़ा प्रकारे आंदोलन करुन पूर्ण राज्याचेच लक्ष वेधून घेतले. शेवटी सरकारला व खाण कंपन्यांनाही या आंदोलनाची दखल घ्यावी लागली.

बाल हक्क आयोगाच्या सुजाता भाटकर, कार्मेलिना फ्रास्को आदींनी सोनशी गावात भेट देऊन एकूण परिस्थितीची जाणीव करुन घेतली. खाण व्यवसायामुळे गावात होणारे धूळ प्रदूषण व शुद्ध पाण्याचा अभाव याचा मोठा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत आहे. मुलांना दम्याचा त्रास होण्याची शक्यता असून त्याचे संभाव्य धोके दिसू लागले आहेत. खाण कंपन्यांकडून आरोग्य तपासणीची कोणतीही सुविधा नाही. अशा विविध विषयांवर आयोगाच्या सभासदांनी चर्चा केली. यात खास करुन धूळ प्रदूषण व शैक्षणिक नुकसानीची समावेश आहे.

सोनशी भागातील शिक्षणाची अवस्था फार विदारक झाली आहे. सभोवताली खनिज खाणी व मधोमध शाळेची इमारत. शाळेत मोठय़ा प्रमाणात साचणारे धूळ व सततच्या आवाजाने वर्गात शैक्षणिक वातावरणच नाही याचा मोठा फटका शिक्षणावर होत आहे. म्हणून अनेक मुलांनी या शाळेकडेच पाठ फिरवून सांखळी, होंडा, नावेली आदी भागातील शाळांकडे आपला मोर्चा वळविला आहे. मात्र ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे त्यांच्या मुलांना सरकारी शाळेशिवाय पर्याय नाही. या परिस्थितीचा संपूर्ण अभ्यास आयोगाच्या सभासदांनी केला असून अहवाल सरकारला सादर करणार आहेत.

Related posts: