|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पाली-सत्तरीत टँकरद्वारे पाणी पुरवठय़ाची सोय

पाली-सत्तरीत टँकरद्वारे पाणी पुरवठय़ाची सोय 

प्रतिनिधी/ वाळपई

पाली-सत्तरी गावातील देऊळवाडा व घाणवटीवाडा भागात गढूळ पाणी पुरवठय़ामुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांनी वाळपई पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा दिल्यामुळे सोमवारपासून टँकरद्वारे पाणी पुरवण्यास प्रारंभ झाला आहे. गढूळ पाण्याची समस्या ही गावातील बोरवेअल खराब झाल्याने आहे. सदर बोरवेअलची दुरुस्ती करणे सध्यातरी अवघड आहे, मात्र नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही, याची गांभीर्याने दखल घेण्यात येणार आहे, असे आश्वासन अधिकारीवर्गाने दिले आहे.

त्याचबरोबर सध्या दाबोस जलशुद्धिकरण प्रकल्पातून हिवरे गावापर्यंत जवळपास 9 कोटी खर्चुन घालण्यात येणाऱया जलवाहिनीचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

वाळपईपासून 6 कि.मी. अंतरावर ठाणे ग्रामक्षेत्रातील पाली गावातील देऊळवाडा व घाणवटीवाडा भागात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. अल्प प्रमाणात मिळणारे पाणीही गढूळ स्वरुपात मिळत असल्याने ते वापरता येत नाही. त्यामुळे नागरिकांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी मोर्चा नेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे खात्याची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

सोमवारी सकाळी अधिकाऱयांनी गावात भेट देऊन यासंबंधी पाहणी केली. तेथील बोरवेअलमधून गढूळ पाणी येत असल्याचे दिसून आले. बोरवेअलची माती शेडसदृष्य आहे, तसेच पाण्याची पातळी एकदमच खाली गेल्याने पाण्याबरोबर मातीही येत आहे. यावर सध्यातरी कोणताही उपाय करणे शक्य नाही. तसे उपाय करण्याचा प्रयत्न केल्यास सध्या मिळणारे थोडेथोडके पाणीही पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टँकरद्वारे ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूही करण्यात आला आहे. ग्रामस्थांना पाण्याची कोणतीही कमतरता भासणार नाही याची काळजी खाते घेईल, मात्र यासंबंधी खात्याशी संपर्कात राहावे, असे आवाहन अधिकाऱयांतर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, दाबोस-हिवरे दरम्यान सध्या घालण्यात येणाऱया जलवाहिनीचे काम डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळणार आहे. तोवर टँकरद्वारे मिळणाऱया पाण्याचा वापर करावा, असे आवाहन सदर अधिकाऱयांनी केले.

Related posts: