|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सचिन तेली आणि प्रचला आमोणकर यांनी स्वरसाजाने जागविल्या दिनानाथांच्या आठवणी

सचिन तेली आणि प्रचला आमोणकर यांनी स्वरसाजाने जागविल्या दिनानाथांच्या आठवणी 

प्रतिनिधी/ पणजी

‘मर्मबंधातली ठेव ही’ हा नाटय़गीतांचा कार्यक्रम मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार 24 एप्रिल रोजी कला अकादमीच्या तालीम सभागृहात आयोजित करण्यात आला होता. नाटय़संगीतप्रेमींची तुडुंब गर्दी लाभलेल्या या कार्यक्रमामध्ये आघाडीचे गोमंतकीय शास्त्रीय गायक सचिन तेली आणि प्रतिभावंत गायिका प्रचला आमोणकर यांनी आळविलेल्या सुमधुर स्वरसाजाने मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या आठवणी ताज्या केल्या.

दुपारी 3.30 ते 4 वाजताच्या दरम्यान सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे पद्मश्री प्रसाद सावकार यांनी अध्यक्षपद भूषविले. व्यासपीठावर शास्त्रीय गायक रूपेश गावस व इतर मान्यवर उपस्थित होते. रूपेश गावस यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभीचे प्रास्ताविक केले. गाजलेल्या नाटकांमधली पदे सादर करताना हार्मोनियमवर प्रसिद्ध संवादिनीवादक दत्तराज सुर्लकर यांनी उत्तम साथ दिली तर तबल्यावर दयानंद कांदोळकर, दयानिधेश कोसंबे आणि आणखीन एका तबलावादकाने आपल्या तबल्यावरील उत्तम नियंत्रणाचे दर्शन नाटय़संगीत रसिकांना घडविले. रूपेश गावस यांनी सूत्रसंचालकाची भूमिका यशस्वीरित्या पेलताना नाटय़गीतही सादर केले. 

गाजलेल्या नाटय़पदांना रसिकांची उत्तम दाद 

संगीत ‘मानापमान’ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहीलेल्या संगीत ‘संन्यस्त खड्ग’ या नाटकांमधील नाटय़गीते सादर करण्यात आली. सर्व पदांना नाटय़रसिकांची उत्तम दाद व वाहवा मिळाली. ‘पंचतुंड नररूंद मालधर पार्वतीश आधी नमितो’ या नांदीने नाटय़गीतांच्या सादरीकरणाला प्रारंभ झाला. संगीत ‘मानापमान’ या मास्टर दिनानाथ मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने व स्वरांवरच्या हुकुमतीने गाजविलेल्या संगीत नाटकातील ‘प्रेम सेवा शरण’ हे पद गायक सचिन तेली यांनी सादर केले. लवचिकतेने फिरणारा मधुर व कोमल आवाज आणि आलापावरची हुकुमत यामुळे तेली यांनी या गीताच्या सादरीकरणाबद्दल रसिकांकडून टाळ्या व वाहवा मिळविली. ‘युवती मना’ हे संगीत मानापमान याच नाटकातील नाटय़गीत सौ. प्रचला आमोणकर यांनी आपल्या मधुर आवाजात सादर केले. आलाप, नजाकत, हरकती, लयबद्धता, आवाजातली लवचिकता यामुळे सौ. आमोणकर यांनीही उपस्थितांची दाद मिळविली. ‘मानापमान’मधलेच अतिशय गाजलेले व नाटय़संगीतप्रेमींच्या स्मृतीत चिरंतन वाजत राहणारे ‘शूरा मी वंदीले’ हे नाटय़गीत रूपेश गावस यांनी चांगल्याप्रकारे सादर केले. त्यांनाही श्रोत्यांची दाद मिळाली. संगीत ‘संन्यस्त खड्ग’ या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहीलेल्या संगीत नाटकामधील ‘मर्मबंधातली ठेव ही’ हे अतिशय गाजलेले नाटय़पद सचिन तेली यांनी गायिले व प्रेक्षकांच्या प्रचंड टाळ्यांचे ते शेवटी धनी ठरले. कार्यक्रमाच्या शेवटी सादर झालेले ‘दिव्य स्वातंत्र्य रवी’ हे पद सौ. प्रचला आमोणकर यांनी अतिशय सुंदररीत्या सादर केले व या आटोपशीर कार्यक्रमाची सुंदररीत्या सांगता झाली. या कार्यक्रमाला संगीतप्रेमींचीच नव्हे, तर दर्दींचीही गर्दी लाभलेली पहायला मिळाली.  

Related posts: