|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » देशासाठीचे समर्पण सावरकरांच्या अभ्यासतून समजते

देशासाठीचे समर्पण सावरकरांच्या अभ्यासतून समजते 

प्रतिनिधी/ वाळपई

स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशहित व स्वातंत्र्यासाठी विविध मार्गाने लढा देणारे अजब रसायन होते. स्वातंत्र्य चळवळीला खतपाणी घालताना व अंदमानच्या कारागृहात 11 वर्षे असहय़ हाल-अपेष्टांनी जेवढय़ा वेदना झाल्या नसतील त्यापेक्षा अधिक वेदना आज त्यांच्या कार्यासंबंधी चुकीचे उद्गार व संशयाची बाजू घेणाऱया विचारामुळे त्यांच्या पवित्र्य आत्म्यास झाल्या असतील. देशातील नागरिकांनी त्यांच्या जीवनाचा अभ्यास केल्यास खऱया हालअपेष्टा काय आहेत याची जाणीव होईल. तसेच अशा व्याख्यानमालेद्वारे न समजलेल्या सावरकरांचे खरे जीवन प्रकाशझोतात येण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन डॉ. जयंत कुलकर्णी (पुणे) यांनी केले.

गोमंतक मराठी अकादमी सत्तरी विभाग व वाळपई सम्राट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वाळपई वनप्रशिक्षण सभागृहात आयोजित सावरकर व्याख्यानमालेतील ‘न समजलेले सावरकर’ या विषयावर दुसरे व शेवटचे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

डॉ. जयंत कुलकर्णी यांनी व्याख्यानात सावरकर यांच्याबाबत अनेक न समजणाऱया विषयावर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, अवघ्या 19व्या वर्षापासून सावरकरांना आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या विचारांना प्रोत्साहित करीत चळवळीत भाग घेतला. शिक्षणासाठी लंडनमध्ये गेलेल्या सावरकरांना भारताच्या स्वातंत्र्यचळवळीसाठी विविध मार्गाने प्रयत्न करताना त्याचठिकाणी देश स्वातंत्र्याची विचारसरणी मानणाऱया युवकांचे संघटन करण्याची कामगिरीही त्यांनी पेलली होती. सशस्त्र क्रांतीशिवाय आपणास देशस्वतंत्र करता येणार नाही, अशा वैचारिक भावनेतून त्यांनी अनेक लढे उभारले. यामुळे दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा भोगताना आपल्यात वैचारिक स्तरावर बदल घडवून आणला खरा मात्र यात देशस्वातंत्र्याच्या विचारांना कधीही मुरड घातली नाही. लिखाण, संघटन व क्रांतीकारक समर्थक यातील गोष्टींना प्रोत्साहन देऊन त्यांनी लढा दिला.

याप्रसंगी व्यासपीठावर मराठी अकादमीचे आनंद मयेकर, केरी सम्राट क्लबचे अध्यक्ष दीपक नार्वेकर, वाळपई सम्राट क्लबचे अध्यक्ष संजय हळदणकर, नंदा माजीक, नरहरी हळदणकर, भाग्यरेखा गावस, विनय नाईक आदींची खास उपस्थिती होती. दीपक नार्वेकर यांच्याहस्ते सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांनी व्याख्यानमालेचा कार्यक्रम सत्तरीत पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असल्याने आनंद व्यक्त केला.

भाग्यरेखा गांवस यांनी स्वागत केले. प्रचेता गावकर, रोशन देसाई, सविता गिरोडकर यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. सरिता माजीक यांनी सूत्रनिवेदन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related posts: