|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » हार्बरवर रेल्वे रुळाला तडे

हार्बरवर रेल्वे रुळाला तडे 

हार्बर मार्गावरील सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक सोमवारी सकाळी विस्कळीत झाली होती. वाशी ते मानखुर्ददरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर अप दिशेची वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती. ऐन सकाळच्यावेळी लोकल वाहतुकीचा खोळंबा झाल्याने कामावर जाण्यासाठी निघालेल्या नवी मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. या गोंधळामुळे लोकलच्या 9 फेऱया रद्द करण्यात आल्या होत्या.

सकाळी साडेआठच्या सुमारास वाशी ते मानखुर्द स्थानकांदरम्यान अप मार्गावर रेल्वे रुळाला तडे गेले होते. त्यामुळे सीएसटीच्या दिशेने जाणारी अप मार्गावरील वाहतूक वाशी ते मानखुर्द स्थानकांदरम्यान बंद करण्यात आली होती. परिणामी अप मार्गावरील लोकल गाडय़ा एकामागोमाग उभ्या होत्या. साडेनऊ वाजता रेल्वे रुळ दुरुस्त करुन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तोपर्यंत हार्बर मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. सकाळी साडेनऊ वाजता जरी वाहतूक सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले असले तरी सीएसटीच्या दिशेची वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. या गोंधळामुळे 45 फेऱयांना लेटमार्क लागला तर 9 फेऱया रद्द करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, सीएसटी स्थानकावर मोठा अनर्थ टळला. अप धीम्या मार्गावरील ट्रकवर चार फूट लांबीचा रेल्वे रुळाचा तुकडा आढळून आला. स्थानकाच्या यार्डात काम करणारे सुरेंद्रकुमार शर्मा यांनी प्रसंगावधान राखून रुळाचा तुकडा ठेवणाऱया तरुणाला ताब्यात घेतल्यामुळे मोठा अपघात टळला. देव सुखालाल कोल (19) असे त्या तरुणाचे नाव असून, त्याला पोलिसांनी 27 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. देव हा फुगे विकण्याचा व्यवसाय करत असल्याचे समजते.

याआधी मध्य रेल्वेवरील रुळांवर लोखंडी रॉड ठेवण्याच्या घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा रुळांवरील असुरक्षितता समोर आल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱया या घटना कधी थांबणार असा सवाल प्रवाशांमधून विचारला जात आहे.