|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सरकारने शेतकऱयांचा विश्वासघात केला

सरकारने शेतकऱयांचा विश्वासघात केला 

नाफेडमार्फत सुरू असलेली तूर खरेदी केंद्र अचानक बंद करून राज्य सरकारने शेतकऱयांचा विश्वासघात केल्याची टीका विरोधी पक्षाने केली आहे. सरकारने तूर खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावीत अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा विरोधी पक्षाने दिला आहे.

राज्यातील तूर खरेदीची मुदत 22 एप्रिल रोजी संपली. ही मुदत संपल्याने नाफेडने तूर खरेदी करणे थांबवले आहे. या निर्णयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सोमवारी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

गेल्या वर्षी तूरडाळीचे दर गगनाला भिडले म्हणून सरकारने शेतकऱयांना तूर लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. सरकारवर विश्वास ठेवून शेतकऱयांनी मोठय़ा प्रमाणात तूर लागवड केली. सरकारने तुरीला हमीभाव जाहीर करून त्याची खरेदीही सुरू केली. मात्र, बारदाना आणि गोदाम उपलब्ध नाहीत असे कारण देऊन बहुतांश शेतकऱयांची तूर खरेदी केली नाही. तुरीचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत तूर खरेदी सुरू राहील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पण मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला नाही. ही राज्यातील शेतकऱयांची फसवणूक आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तूर खरेदी थांबवण्याच्या निर्णयावरून सरकारला खडे बोल सुनावले आहेत. अजूनही असंख्य खरेदी केंद्रांवर हजारो क्विंटल तूर तोलाईसाठी प्रतिक्षेत आहे. शेतकऱयांनी अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लावल्या आहेत. अशा परिस्थितीत खरेदीची व्यवस्था वाढवण्याऐवजी खरेदी बंद करणे म्हणजे शेतकऱयांना लुटण्यासाठी व्यापाऱयांना मोकळे रान देण्यासारखे आहे, अशी टीका विखे-पाटील यांनी केली आहे. सरकारने तूर खरेदीसाठी ठरवलेली 22 एप्रिलची मुदत रद्द करून संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राज्य सरकारच्या नियोजनशून्य धोरणामुळे तूर उत्पादक शेतकऱयांचे हाल होत असून उत्पादन पाचपट वाढलेले असताना नियोजन करण्याऐवजी सरकार झोपले होते काय? असा संतप्त सवाल विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. विक्रीअभावी शेतकऱयांकडे असलेली संपूर्ण तूर सरकारने खरेदी करावी. तसेच आतापर्यंत खरेदी केलेल्या सर्व तुरीला हमीभाव अधिक पाचशे रूपये क्विंटल याप्रमाणे बोनस द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 

 

 

Related posts: