|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तर कचरा शुल्काच्या प्रश्नावरून न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

तर कचरा शुल्काच्या प्रश्नावरून न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार 

प्रतिनिधी/ मडगाव

मडगावच्या नगराध्यक्षांनी नव्या कचरा शुल्काच्या प्रश्नावर जी आश्वासने दिली आहेत ती पाळून आवश्यक पावले न उचलल्यास आणि या प्रश्नावर तोडगा न काढल्यास न्यायालयासह सर्व उचित अधिकारिणींचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा ‘शॅडो कौन्सिल फॉर मडगाव’ने दिला आहे. यासंदर्भात मंगळवारी सकाळी मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत तावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. 

याप्रसंगी ‘शॅडो कौन्सिल’चे निमंत्रक सावियो कुतिन्हो, शंकर (बाबू) कुडाळकर, सी. पी. जग्गी, लॉरेल आब्रांचिस व इतर व्यापारी हजर होते. सुधारित दर जोपर्यंत निश्चित केले जात नाहीत तोपर्यंत नव्या कचरा शुल्काची आकारणी न करण्यास मडगाव पालिका सहमत झाली असल्याची माहिती शॅडो कौन्सिलकडून नगराध्यक्षा बबिता आंगले प्रभुदेसाई यांच्या भेटीनंतर देण्यात आली होती. त्याची आठवण यावेळी करून देण्यात आली.

मूळ घरपट्टी, व्यापार/फलक शुल्क आणि घरांसाठी 600 रुपये व व्यापारी आस्थापनांसाठी 1800 रुपये हे प्राथमिक कचरा शुल्क तेवढे गोळा केले जाणार असून सुधारित दर ठरविण्यापूर्वी सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेतले जाणार असल्याचे आश्वासन नगराध्यक्षांच्या भेटीत देण्यात आले होते. सुधारित दर ठरविल्यानंतर शुल्कापोटी जादा रक्कम गोळा केली गेली असल्याचे दिसून आल्यास सदर फरकासंदर्भात आवश्यक व्यवस्था करण्याचे आश्वासनही त्यावेळी देण्यात आले होते, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

पार्किंगच्या जागेतील कचरा शुल्कही सुधारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच घर बंद असल्यास जे संबंधित पुराव्यासहित अर्ज करतील त्यांना कचरा शुल्कातून वगळावे, असे शॅडो कौन्सिलने सूचविले आहे. त्याशिवाय घरपट्टी आणि व्यापार कराच्या अनुषंगाने नोंदणी न केलेल्या घरांचे आणि व्यापारी आस्थापनांचे सर्वेक्षण करण्यास प्राधान्य देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचीही आठवण या निवेदनात करून देण्यात आली आहे.

Related posts: