|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कर्जमुक्ती द्या, अन्यथा बाजूला व्हा

कर्जमुक्ती द्या, अन्यथा बाजूला व्हा 

कर्जमाफी, वीज दर आणि तूर प्रश्नावर विशेष अधिवेशन घ्या : अजित पवार

प्रतिनिधी/ सांगली

शेतकरी अडचणीत आहे. आता टोलवाटोलवी नको. माहिती घेण्यास कितीवेळ लावणार, राजकीय इच्छाशक्ती दाखवून तातडीने शेतकऱयांना कर्जमाफी द्यावी अन्यथा राज्याला मुक्ती देऊन बाजूला व्हावे. संघर्ष यात्रा संपूनही सरकारचे कर्जमाफीबाबत डोळे उघडले नाहीतर टोकाची भूमिका घेण्याचा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. कर्जमाफी, वीजदर आणि तूर प्रश्नावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणीही त्यांनी केली.

शेतकरी कर्जमाफीसाठी काढलेली संघर्ष यात्रा बुधवारी सांगलीत आली. पत्रकार बैठकीत बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्य आणि केंद सरकारची शेतकरी विरोधी भूमिका आहे हे पावलोपावली जाणवत आहे. तूर खरेदी, वाढविण्यात आलेले विजेचे दर, उर्जित पटेल आणि स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य असो या सर्वांचे वक्तव्य आणि सरकार घेत असलेले निर्णयावरून धोरण स्पष्ट होते. अशी वक्तव्ये कशी केली जातात. याचा बोलविता धनी कोण ? प्रमुखांच्या मर्जीशिवाय एक अक्षरही न बोलणारी मंडळी असे वक्तव्य कसे करतात, आदी प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

म्हणजेच राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱयांच्या विरोधात आहे. गरज नसताना साखर आयात केली याचा परिणाम ऊसदरावर होणार आहे. यावर एकही खासदार बोलत नाही. एफआरफी देण्यासाठी गेल्यावर्षी कर्ज काढावे लागले. सरकारचा सावळागोंधळ सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात सधन भाग आहे. येथे आत्महत्या कशा होतात. पण सर्वत्र शेतकऱयांची अवस्था वाईट आहे. निव्वळ दिशाभूल केली जात आहे. विजेची दरवाढ केली असून 220 टक्क्यांपर्यंत दरवाढ होणार आहे, असे ते म्हणाले.

आघाडी सरकारच्या काळातच राज्य विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे, असे सांगून पवार म्हणाले, आता विजेचे शॉर्टेज नाही. आम्ही सरकारमध्ये असताना शेतकऱयांना मदत केली. आता शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. सध्या सरकारकडून निव्वळ चालढकल सुरू आहे. माहिती घेतो, देणार आहे, अशी पोकळ वक्तव्य केली जात आहेत.

मुख्यमंत्र्यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवून कर्जमाफीचा निर्णय घेतला पाहिजे, या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा सुरू केली आहे. कोणताही स्वार्थ नाही, राजकारण नाही, शेतकऱयांना वाचवायचे आहे. यामुळेच आज संघर्ष यात्रेला प्रतिसाद चांगला मिळत आहे. शेतकऱयांनीही या यात्रेत सहभागी व्हावे, यात्रा काढूनही सरकारचे डोळे उघडले नाहीतर मात्र टोकाची भूमिका घेतली जाईल, असा इशारा देऊन पवार म्हणाले, शेतकरी कर्जमाफी, वीजदरवाढ आणि तूर खरेदीप्रश्नी विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणी करण्यात येणार आहे.

दारू पिणाऱयांसाठी, न पिणाऱयांना भुर्दंड

बार बंद झाले. यामुळे उत्पन्न बुडाले. हे उत्पन्न भरून काढण्यासाठी पेट्रोलचा टॅक्स वाढविला. दारू पिणाऱयांकडून मिळणारा टॅक्स न पिणाऱयांकडून घेताना  काहीच कसे वाटत नाही ? अशी टीका करून पवार म्हणाले, जे पितात त्यांना टॅक्स लावा. मात्र यांनी उलटेच केले आहे. याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे.

दुष्काळाचेनिमित्त काढून टॅक्स वाढविला मात्र किती टॅक्स जमा झाला, शेतकऱयांसाठी किती खर्च केला याची काहीही माहिती नाही. पेट्रोलचा दर 25 रूपये आणि 51 रूपये टॅक्स हे कुठं जगात नसेल. हे कसले जुलमी सरकार हे कळत नाही. सत्तेवर येण्यासाठी निवडणुकांमध्ये अनेक आश्वासने दिली मात्र एकाचीही अंमलबजावणी केली नाही. अपयश झाकण्यासाठीच सर्वसामान्यांच्या डोक्यावर असे अन्यायी निर्णय लादत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

स्थानिक निवडणुकीतील पराभवाबाबत विचारले असते अजित पवार म्हणाले, हे जे आम्ही करीत आहे ते मागेच केले असते तर लोकांना कळालं असत. या निवडणुकांमध्ये आम्ही कमी पडल्याने अपयश आल्याचे त्यांनी कबुली दिली.

शेतकऱयांबद्दल सेनेला प्रेम नाही

शिवसेनेच्या भूमिकेबद्दल अजित पवार म्हणाले, देशात भ्रष्ट मनपा म्हणून मुंबईचा उल्लेख केला जात आहे. शासनामध्ये टिकून राहण्यासाठी त्यांचा उद्योग सुरू आहे त्यांना शेतकऱयांबाबत प्रेम नाही. त्याना खरोखरच शेतकऱयांबद्दल आपुलकी असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे. सरकारमधील घटकांनी अंमलबजावणी करायची असते. मागणी कसली करता अशीही टिका केली.

नोटाबंदीमुळे शेतकऱयांचे नुकसान

केंद्र सरकारने अचानक नोटाबंदी केली. यानंतरच्या काळात जिल्हा बँकांत जमा झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या हजारो कोटींच्या नोटा परत घेतल्या नाहीत. याबाबत पंतप्रधान, अर्थमंत्री, राज्यपाल यांच्यासह सर्वांकडे पाठपुरावा केला. स्वतः शरद पवार यांनीही या नेत्यांची भेट घेऊन या नोटा घेण्याची विनंती केली मात्र त्या अद्याप नेल्या नाहीत. मात्र सेव्हींगवर शेतकऱयांना बँकांना व्याज द्यावे लागते. शेतकऱयांसह बँकांनाही याचा मोठा फटका होणार असल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, नुसत्या चौकशावर चौकशा सुरू केल्या आहेत. ज्यांनी चुका केल्या त्यांना शिक्षा करा. मात्र पर्यायी व्यवस्था आणून नोटा चलनात घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडेही मागणी केली मात्र बघतो, चौकशी करतो, असे म्हणून वेळकाढूपणा सुरू आहे, असे ते म्हणाले.

 आबा असते तर सरकारला

सळो की पळो करून सोडले असते

माजी गृहमंत्री आर. आर. आबा यांची आठवण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व अजित पवार यांनी काढली. पवार म्हणाले, आबांचे वक्तृत्व, गोरगरिबांबद्दल असणारी आसं, ओढ यातून त्यांनी विरोधकांना धारेवर धरले. हे राज्य विसरणार नाही. ते आज असते तर सरकाराला सळो की पळो करून सोडले असते, असेही ते म्हणाले.

Related posts: