|Friday, February 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अभिजात भाषेआधीच अभिजात भाषादिन

अभिजात भाषेआधीच अभिजात भाषादिन 

राज्य शासन कुठला दिवस मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करणार? त्यामुळेच 1 मे हा मराठी राज्य स्थापना दिवस असल्याने तोच अभिजात भाषा दिवस असावा आणि तो दिवस जनमानसात आधीच रुढ व्हावा हाही उद्देश मराठी अभिजात भाषादिन साजरा करण्यामागे आहे.

 

‘या महाराष्ट्र देशी मोठी गंमत सुरू आहे. भले भले बेंबीच्या देठापासून ओरडतायत, ‘मराठी भाषा मरू लागली’ आणि हे ओरडणारे कोण? तर ज्यांची मुले कॉन्व्हेंटमध्ये शिकतायत ते!’ ज्येष्ठ नाटकाकार प्रेमानंद गज्वी यांचे हे उद्गार आहेत. केंद्र शासनाकडून मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून घोषित होईल, तेव्हा होईल, मात्र ती सर्व पुराव्यानिशी अभिजातच असल्याचे सिद्ध झाल्याने गज्वी यांनी 1 मे हा महाराष्ट्र दिन अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करायला प्रारंभ केला आहे. तो साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली त्यामागची सविस्तर भूमिका विषद केली आहे. त्यावेळी त्यांनी मांडलेल्या वरील विचारातून भाषा ही अस्मिता म्हणून डंका पिटणारेच आपल्या मातृभाषेबाबत किती उदास आहेत हेच दाखवून दिले आहे.

अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना 2013 साली प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. ही समिती स्थापन झाल्यानंतर अवघ्या दीड-पावणेदोन वर्षांतच मराठी भाषा ही अभिजात भाषा असल्यासंदर्भातला आपला अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर राज्य शासनाने तो केंद्र शासनाकडे पाठविला. केंद्र शासनाने तो साहित्य अकादमीकडे (दिल्ली) सोपविला. पुढे अकादमीने तज्ञ भाषा समितीकडे अहवाल सोपविल्यानंतर भाषा समितीनेही मराठी भाषा सर्व पुराव्यानिशी अभिजात भाषा असल्याचे एकमुखाने मान्य केले. त्यानंतर तसा अहवाल साहित्य अकादमीनेही संबंधित केंद्रीय मंत्रालयाकडे पाठवून दिला. तरीही अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही. तो का घेण्यात आला नाही, याचे नेमके उत्तर आताही राज्य शासनाकडे नाही. वास्तविक, केंद्र शासनाच्या संबंधीत मंत्रालयाकडून अभिजात भाषेचा दर्जा मराठीला देण्याबाबत कार्यवाही होत नसेल, तर राज्य शासनानेच पुढाकार घ्यायला हवा होता. मात्र, तसे झाले नसल्याच्या पार्श्वभूमीवर गज्वी यांनी आपल्या बोधी नाटय़ परिषदेतर्फे गेली काही वर्षे 1 मे हा मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करायला प्रारंभ केला आहे. याबाबत त्यांचे खरे तर अभिनंदनच करायला हवे. कारण ‘जी गोष्ट शासन पातळीवरून होत नाही, त्याचा प्रारंभ नागरिकांनीच करायला हवा. शासन सुस्तावलेले असते. शासनाच्या पातळीवर लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे प्रशासकीय निर्णयावर अवलंबून असतात आणि प्रशासन हे नेहमीच राज्यकर्त्यांकडेच बोट दाखवित असते. मराठी अभिजात भाषेच्या निर्णयाबाबत असेच झाले असून अशावेळी लोकउठावाचे उपक्रम राबवावे लागतात. लोकशाहीत त्याला अनन्यसाधारण महत्त्व असते. गज्वी यांच्यासारख्या लोकशाही मूल्यावर अढळ विश्वास ठेवणाऱया विचारी कलावंताने हे जाणल्यानेच त्यांनी मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून घोषित होण्याआधीच ती अभिजात भाषा असल्याचा दिवस साजरा करायला प्रारंभ केला आहे. यावर्षी तो मुंबईत साजरा केला जात असून यावेळी त्यांनी ‘अभिजात  मराठी भाषा : दशा आणि दिशा’ या विषयावर प्रसिद्ध लेखक राजन खान यांचे व्याख्यान आणि ‘काव्यकार संमेलन’ आयोजित केले आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यावर मराठीच्या विकासासाठी 300 कोटी दरवर्षी प्राप्त होणार आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे. पण मराठीचा विकास करण्यासाठी या घडीला सहा सरकारी संस्था कार्यरत आहेत. यात साहित्य संस्कृती मंडळ, भाषा संचालनालय, मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ, मराठी भाषा विभाग, दार्शनिक विभाग, राज्य विकास मराठी संस्था आदींचा यात समावेश आहे. मात्र, तरी मराठीचा विकास होत नाही, याचे कारण सरकारची भाषेसंबंधीची उदासिनता. म्हणूनच कवी कुसुमाग्रज यांनी ‘मराठी मंत्रालयाच्या दारात फाटक्या वस्त्रात उभी आहे,’ असे म्हणून या सहाही संस्थांची भाषेसंबंधीची निक्रीयता उघड केली होती. 

 मराठी भाषा अभिजात भाषा आहेच, याबाबत बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, या देशाचा इतिहास आठ हजार वर्षे जुना आहे. अशी नोंद ‘रायटिंग ऍन्ड स्पिचेस’ खंड 18-भाग 3- पृष्ठ-2 वर आलेली आहे. त्यावरून अजून एक गोष्ट स्पष्ट होते, की आजची मानली जाणारी मराठी अभिजात भाषा ही प्राकृत भाषांचेच विकसित रुप असून या प्राकृतभाषा म्हणजेच सिंधुसंस्कृती होय! आजची मराठी सांकेतिक चित्रलिपी भाषेपासून विकास पावत नाव बदलत आली. ‘प्राचीन मरहट्ठी, मरहट्ठी भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा’ असा मराठीचा प्रवास आहे. महाराष्ट्री हे महारट्ठीचे नामकरण संस्कृत भाषेने, तिच्यातल्या पंडितांनी केले. संस्कृत भाषेला संस्कृत हे नाव मिळण्याआधी महाराष्ट्री भाषा अस्तित्वास होती. एवढेच नाही, तर ती प्रगल्भ झालेली होती. (संदर्भ-अभिजात मराठी भाषा समिती अहवाल-2013-पृष्ठ 15)

अर्थात तरीही मराठी अभिजातच भाषा असल्याचे केंद्र शासन जाहीर करीत नाही. म्हणूनच गज्वी हे अभिजात भाषा दिवस साजरा करीत आहेत, तो 1 मे रोजीच ते का साजरा करतायत? हा प्रश्न सामान्य मराठीजनांना पडू शकतो. याबाबत आपली भूमिका मांडताना गज्वी म्हणतात, केंद्र सरकार मराठी अभिजात भाषा दिवस घोषित करेल ती तारीख 1 मे असेलच असे नाही. ती कोणतीही असू शकते आणि तीच अभिजात मराठी भाषा दिनाची तारीख अधिकृत मानली जाईल. पण महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. त्यामुळे मराठी अभिजात भाषेचा दिवस 1 मे हाच साजरा केला गेला पाहिजे.

त्यातही मराठी भाषा दिवस म्हणून कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. त्यामुळे मराठी अभिजात भाषेच्या तारखेचा गोंधळ निर्माण होण्याचीच शक्यता जास्त आहे. मग राज्य शासन कुठला दिवस मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करणार? त्यामुळेच 1 मे हा मराठी राज्य स्थापना दिवस असल्याने तोच अभिजात भाषा दिवस असावा आणि तो दिवस जनमानसात आधीच रुढ व्हावा हाही उद्देश मराठी अभिजात भाषादिन साजरा करण्यामागे आहे.

डॉ. आंबेडकरांनीच म्हटले होते, जी गोष्ट सरकारकडून प्राप्त होत नाही, त्यासाठी लोकउठाव व्हायला हवा. अर्थात गज्वी यांनी मराठी अभिजात भाषा दिवस साजरा करून सरकारने अभिजात मराठी भाषा जाहीर करण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारानेच एक पाऊल पुढे टाकले आहे!

Related posts: