|Monday, September 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » लाखेंच्या मोर्चाने आता समाज प्रबोधनाचीही चळवळ हाती घ्यावी

लाखेंच्या मोर्चाने आता समाज प्रबोधनाचीही चळवळ हाती घ्यावी 

मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी लाखेंच्या संख्येने मोर्चे काढून समाजावरील अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न चालविला आहे. यातून गावोगावी समाजबांधव एकत्रही येत आहेत. पण याच समाजातील शीतल वायाळ या मुलीने हुंडय़ापायी आत्महत्या केली, यातून मराठा समाजाने आधी आपल्या समाजातील अनिष्ट प्रथांच्या विरोधात चळवळ उभारण्याचीच गरज निर्माण झाली आहे.

विवाह करताना जी गोष्ट जास्त करून लक्षात घेतली जाते ती म्हणजे जात. लग्न हे जातीतच झाले पाहिजे. यावर सगळेच ठाम असतात. श्रमानुसार विभागलेला समाज जातीत विभागला गेलाय, जातीची शकलं पडलीत. प्रत्येकालाच आपण आमूक जातीचे म्हणताना स्वाभिमान वाटू लागलाय. शीतल वायाळने मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत आपल्या जातीचा उल्लेख केलाय ती ज्या जातवर्गातील होती तो वर्ग ‘जात’ या एका आवाजावर लाखेंच्या संख्येने एक झालाय. परंतु ते शीतल वायाळ प्रकरणी ‘जात’ शब्दापासून दूर जाताहेत. त्यांच्यामते जात शब्दापेक्षा शेतीची नापिकी हा उल्लेख महत्त्वाचा आहे म्हणजे गरज वाटेल तेव्हा जात तलवारीसारखी आणि लागेल तेव्हा ढालीसारखी वापरायची. म्हटली तर ढाल म्हटली तर तलवार. जेव्हा आपण आपल्या जातीचा अभिमान करू लागतो, त्याला रंग देतो, दिशा देतो तेव्हा अशा घडणाऱया बऱयावाईट घटनांचीही जबाबदारीही आपण घेतली पाहिजे.

शीतल वायाळ या भिसेवाघोली लातूरच्या मुलीने हुंडापद्धतीमुळे केलेली आत्महत्या संपूर्ण महाराष्ट्राला वेदना देऊन गेली. 21 वषीय शीतलने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत उल्लेख केलाय, की मराठा समाजातील रुढी परंपरा, देवाणघेवाण कमी व्हावी. नापिकीमुळे वडिलांकडे शीतलला गेटकेन पद्धतीने विवाह करावा एवढाही पैसा नव्हता. शीतलच्या दोन बहिणेंचा गेटकेन पद्धतीने विवाह झालेला आणि आता शितलच्या लग्नात हुंडा देण्यासाठी वडील व्यंकट वायाळ यांना कुठूनही कर्ज मिळत नव्हते. अजब रूढी परंपरा आहेत या एकतर ठरावीक वयोमर्यादेत लग्न करा आणि ते पण हुंडा देऊनच, जमत नसेल तर स्वतःला संपवा.

याच भिसेवाघोली गावात जानेवारी 2016 मध्ये मोहिनी पांडुरंग भिसे या 21 वर्षीय तरुणीने हुंडापद्धती याच कारणास्तव गळफासाने आत्महत्या केली. त्यावेळी मोहिनीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत असे नमूद केले आहे की माझ्या मृत्यूनंतर माझ्यासाठी कोणत्याही धार्मिक विधींवर खर्च करू नये आणि हुंडा पद्धती बंद झालीच पाहिजे. मोहिनी आणि शीतलने आपल्या आत्महत्त्येतून हुंडा पद्धतीचा निषेध केलाय. अर्थात तो फक्त हुंडापद्धतीचाच नसून पुरुषसत्ताक प्रवृत्तीचाही आहे. कारण कोणत्याही बाईवर होणाऱया आत्याचाराला पुरुषी वर्चस्व कारणीभूत असते.

मोहिनीच्या आत्महत्येनंतर भिसेवाघोली गावात ‘हुंडा ना देऊ, ना घेऊ’ असा ठराव घेतला होता. पण हा ठराव कागदावरच राहिला. प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही. मोहिनीनंतर शीतलसुद्धा हुंडय़ासारख्या एका अनिष्ट प्रथेचा बळी गेली. मोहिनीने मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत केलेला धार्मिक विधींचा उल्लेख आणि शितलने केलेला जातीचा उल्लेख आजच्या समाजव्यवस्थेवर प्रखर प्रकाश टाकतो. आजची तरुण पिढी जातपंचायत, रुढी परंपरा यांच्या दहशतीखाली असल्याची प्रकर्षाने जाणीव होतेय. वास्तविक पाहता परंपरा ह्या मानवी जीवन समृद्ध करणाऱया असाव्यात. मोहिनीच्या मनात मृत्यूपूर्वी आलेला विचार धार्मिक परंपरांना विरोध करणारा आहे. धार्मिक परंपरांचा तिटकारा मृत्यूपूर्वी निर्माण व्हावा इतपत या परंपरांचे स्तोम माजले आहे.

शितलल्या आत्महत्येनंतर एका वृत्तवाहिनीच्या शपथ मोहिमेत अनेक लग्नाळू मुलांमुलींनी ‘हुंडा देणार नाही, हुंडा घेंणार नाही’ अशी शपथ घेतली आहे. हे अनेक वर्ष चालले आहे. जे आपल्या लग्नात भरमसाठ हुंडा घेतात ते तरुणही महाविद्यालयीन दशेत अशी शपथ घेत असतात आणि ज्या तरुणी अशी शपथ घेत असतील त्यांचा नाईलाजच असेल. आपल्या लाडक्मया लेकीला ‘चांगले स्थळ मिळावे, तिने सुखाने नांदावे यासाठी बाप वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असतो कारण त्याला हातचे स्थळ घालवायचे नसते. बऱयाचदा चांगला जावई (अर्थात फक्त त्याच्या प्रति÷sचा विचार केला जातो पण त्याच्या सद्गुणांचा नाही) मिळविण्यासाठी ‘बाप’ घरदार, जमीनजुमला सगळे विकायला तयार होतो. हुंडा घेणे ही हाव असते. देणाऱयाने देत जावे, घेणाऱयाने घेत जावे अशा प्रकारे हे हुंडा देणे घेणे चालूच असते. घेणाऱयाला वाटते की देणाऱयाने अजून द्यावे.

कधी कधी मुलीचा बाप लग्नानंतर हुंडा देईन असे कबूल करतो. त्याला वाटते आपण काहीतरी करून पैशांची तजवीज करू शकू. पण दिलेल्या कालावधीत जर पैशांची तजवीज झाली नाही तर मग पिंपरी चिंचवडच्या स्नेहल क्षीरसागरसारखे बळी जातात. सिव्हिल इंजिनियर असलेल्या स्नेहलच्या नवऱयाला 2 लाख रु. रोख आणि 5 तोळे सोने द्यायचे ठरलेले. पण ते शक्मय न झाल्याने स्नेहलला प्राणाला मुकावे लागले. काहीशी अशीच घटना वर्षाराणीची. हलपी-हत्तरगा तालुका निलंगा, जिल्हा लातूर मधल्या वर्षाराणी फुलसुरेचा विवाह हालसी तिप्पनबोने यांच्याशी झालेला पण हुंडा न मिळाल्याने 28 फेबुवारी 2017 रोजी लग्नाच्या पहिल्या वाढदिनी वर्षाराणी या जगात नव्हती. तिच्या वडिलांनी आरोप केला की तिचा गळा आवळून खून करण्यात आला आणि त्यानंतर आत्महत्येचा बनाव केला. खून किंवा आत्महत्त्या काहीही असो वर्षाराणी आज हयात नाही.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2007 ते 2011 या कालावधीत हुंडाबळी व तत्सम घटनांमध्ये वाढ झाली असून देशभरात वेगवेगळय़ा राज्यांमधील हुंडाबळींची संख्या 2012 सालात 8,233 इतकी आहे. दर तासाला एक हुंडाबळी जातो. अतिरिक्त पोलिस आयुक्त दिल्ली महिला व बालक विशेष शाखेच्या सुमन नालवा म्हणतात, ‘हुंडाबळी प्रकरणे फक्त मध्यमवर्गापर्यंत मर्यादित राहिलेली नाहीत. उच्च उत्पन्न असलेल्या सामाजिक, आर्थिक स्तरातही हुंडय़ाची मागणी मोठय़ा प्रमाणावर केली जाते. समाजातील उच्चशिक्षित वर्गाकडूनही हुंडा घेण्यास नकार दिला जात नाही’  जसजसा समाज सुधारतोय, प्रगत होतोय तसतसा रुढी परंपरामध्ये तो खोल रुतत जातो आहे, आजचा सुशिक्षित समाज एवढाही अविचारी नाही की खुळचट रुढी परंपरांना जपून ठेवील. पण माणसाचा स्वार्थ एवढा बोकाळलाय आणि भौतिक सुख हेच सुख असा त्याचा घोर गैरसमज झालाय. या गैरसमजापोठी माणुसकीला काळिमा फासणाऱया घटना घडू लागल्यात. हुंडय़ासारखी अनिष्ट प्रथा फायदेशीर असल्यानेच हे सगळं घडतंय, स्वतःची प्रति÷ा जपताना त्याला सगळय़ा जगाचा विसर पडतोय. एकच विचारावंसं वाटतंय, ‘अरे पुरुषार्थ गाजविणारे तुम्ही दुसऱयाच्या उद्ध्वस्त आयुष्यावर स्वतःचं आयुष्य उभं करण्याचं स्वप्न कसं पाहू शकता?

कल्पना मलये