|Thursday, August 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अपूर्णांकांची बेरीज

अपूर्णांकांची बेरीज 

हात लावील तिथे सोने अशी सध्या भाजपची अवस्था आहे. लढवतील त्या निवडणुका ते विक्रमी मतांनी जिंकत आहेत. त्यामुळे पक्षाचे नेते स्वतःवर खूष असले तर नवल नाही. भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत त्याचे प्रत्यंतर आले. उद्घाटनाच्या भाषणात नितीन गडकरी यांनी हा नवीन गणिती सिध्दान्त मांडला. राजकारणात सर्वच नेते पूर्णांक नसतात. गुंड किंवा वादग्रस्त नेते म्हणजे  अपूर्णांकासारखे असून त्यांना भाजपमध्ये आणून आम्ही सुधारतो आहोत, असे ते म्हणाले. पक्ष वाढीसाठी हे आवश्यकच आहे असा दावा त्यांनी केला. थोडक्यात यशाचे समीकरण सतत सोडवत राहायचे तर त्यासाठी अपूर्णांकांच्या बेरजा उत्तमपणे करता यायला हवे असे भाजपच्या नेत्यांनी पक्के ठरवलेले दिसते. पंचायत ते पालिका भाजप सर्वत्र जिंकला आहे. पण त्यासाठी इतर पक्षातील गुंडपुंड व भ्रष्टाचारी लोकांना सर्रास भाजपमध्ये प्रवेश दिला गेला. कार्यकारिणीची बैठक ज्या चिंचवड नगरीत झाली तेथे राष्ट्रवादीच्या परिवारातील बदनाम व संधीसाधू नेत्यांची आयात केल्यानेच भाजपला विजय शक्य झाला. अशाच रीतीने पक्ष वाढवल्यामुळे पुण्यात नामनिर्देशित नगरसेवकांच्या नियुक्तीवरून भाजपच्या दोन नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी झाली. बेकायदा बांधकामे हे अशा बहुतेक भानगडबाज नेत्यांचे पैसे करण्याचे साधन असते. विरोधी पक्ष म्हणून भाजप असे नेते व त्यांचे व्यवहार यांच्याविरुध्द आवाज उठवत असे. पण आता भाजपचे आता मतपरिवर्तन झालेले दिसते. बेकायदा बांधकामे सरसकट नियमित करण्याचे धोरण फडणवीस सरकारने घेतले आहे. म्हणजे एकीकडे नेते आणि दुसरीकडे त्यांची बेकायदा बांधकामे ही भाजपमध्ये येऊन पावन होऊ लागली आहेत. भाजपमधील जुन्या स्वयंसेवकांना यशाचे गणित सोडवण्याची ही रीत मंजूर  असेलच असे नाही. त्यांचे असंतोषाचे सूर बाहेर येऊ नयेत म्हणूनच बहुधा गडकरी यांनी सुरुवातीलाच मोठय़ा आवाजात आपण योग्य मार्गावरून चालत असल्याचा पुकारा केला असावा.  समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हाच मार्ग अवलंबला. विशेषतः शेतकऱयांच्या प्रश्नावर त्यांनी विरोधकांवर  तोंडसुख घेतले. एकीकडे विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा काहीही परिणाम जाणवत नसल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र त्याच वेळी शेतकऱयांशी थेटपणे संपर्क साधणारी संवाद यात्रा काढण्याची घोषणाही त्यांनी केली. आधीच्या वर्षी दुष्काळाने तर यंदा सुकाळाने शेतकऱयांना मारले आहे. सरकार याबाबत सुरुवातीपासून म्हणावे तसे सावध नव्हते. तुरीचे उत्पादन प्रचंड प्रमाणात होणार याचा अंदाज सरकारला आला नाही. हमीभावापेक्षा क्विंटलला हजारेक रुपये कमी घेऊन शेतकऱयांना तूर विकावी लागली. याविषयी बरीच ओरड झाल्यावर सरकारने  तूर खरेदीची योजना आखली. पण त्यात भयानक ढिसाळपणा होता आणि आहे. मध्यंतरी बारदाने नाहीत म्हणून अनेक ठिकाणी खरेदी होत नव्हती. नंतर सुरू झाली तीही अत्यंत संथ गतीने.  तूर विकण्यासाठी आठ-आठ दिवस शेतकऱयांना रांगेत थांबावे लागले. त्यातच एकदा खरेदी बंद करण्यात आली. मग तिची मुदत 22 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली. आता त्या काळात ज्यांनी टोकन घेतले नाही त्यांची तूर घेतली जाणार नाही अशी दमदाटी सरकार करीत आहे. याबाबत जनतेची नाराजी भाजपचे कार्यकर्ते व नेत्यांनाही ठाऊक आहेच. पण ती योग्य नसून तिला विरोधकच जबाबदार आहेत असे समीकरण फडणवीस यांनी  प्रभावीपणे ठसवले. शेतकऱयांच्या नावाने या योजनेत व्यापारीच विक्री करीत असल्याचा आरोपही त्यांनी आपल्या भाषणात केला. खरे तर या विषयाशी संबंधित सर्व खाती भाजपकडे आहेत. विक्रीमध्ये गैरव्यवहार होत असेल तर कडक कारवाई करायला त्यांचे हात कोणी बांधलेले नाहीत. पण गेल्या तीन महिन्यांमध्ये अशी एकही कारवाई झालेली नाही. आता फडणवीस यांनी धमकी दिली असली तरी यापुढेही ती होईल असे वाटत नाही. गेल्या वर्षी तूरडाळीचे भाव वाढले तेव्हा फडणवीस सरकारातील पुरवठामंत्री गिरीश बापट यांनीही व्यापाऱयांना अशाच धमक्या दिल्या होत्या. त्याही पोकळ ठरल्या होत्या. गेल्या वर्षीच्या वाढत्या भावांचा फायदा घेण्यासाठीच तर यंदा शेतकऱयांनी विक्रमी प्रमाणात तूर पेरली. पण यंदाही पुन्हा जर त्यांना फायदा होण्याऐवजी व्यापारीच लूटमार करणार असतील तर फडणवीस सरकार करते आहे काय असा प्रश्न उपस्थित होणे अपरिहार्य आहे. तुरीप्रमाणेच कांदा, कापूस, द्राक्षे, ऊस इत्यादी पैसे देणाऱया पिकांचे विविध प्रश्न तयार झाले आहेत. ते कसे सोडवणार याचा बैजवार खुलासा सरकार आतापावेतो करू शकलेले नाही. विरोधकांच्या संघर्षयात्रेवर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. पण मुद्दा त्यांना किती प्रतिसाद मिळतो हा नसून शेतकरी समाजात असंतोष आहे की नाही हा आहे. शिवाय, काँग्रेस व राष्ट्रवादीचीच यात्रा नाही. बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासारखे नेतेही आंदोलने करीत आहेत. नगर जिह्यातील शेतकऱयांनी यंदा संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. पण ज्या शेतकऱयांमध्ये असंतोष आहे त्यांनीच भाजपला निवडून दिले आहे हा युक्तिवाद इतर कशाहीपेक्षा सध्या तरी बिनतोड आहे. त्यातून भाजप नेत्यांची समीकरण सोडवण्याची रीत बरोबर आहे हे  मानण्यावाचून सध्या तरी पर्याय नाही. दरम्यान, मिळालेल्या सत्तेमुळे माजू नका असे आवाहन गडकरींपासून ते फडणवीस यांच्यापर्यंत सर्व नेत्यांनी याच कार्यकारिणीत पुनः पुन्हा केले. अपूर्णांकांची बेरीज केली की समीकरण साधणार असले तरी पुढे जाऊन एकूण गणित बिघडू शकते याची जाणीव या नेत्यांना आहे हे बरे आहे. पण ते पुरेसे आहे काय हे भविष्यात दिसेल.