|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » सिंधूला पराभवाचा धक्का

सिंधूला पराभवाचा धक्का 

वृत्तसंस्था /वुहान (चीन) :

येथे सुरु असलेल्या बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत रिओ ऑलिम्पिक सुवर्णजेत्या भारताच्या पीव्ही सिंधूचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. सिंधूच्या पराभवासह भारताचे या स्पर्धेतील आव्हान देखील समाप्त झाले आहे.

शुक्रवारी वुहान स्पोर्ट्स कॉम्पलेक्सवर झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत तिसऱया मानांकित सिंधूला चीनच्या आठव्या मानांकित ही बिंजिगाओकडून 21-15, 14-21, 22-24 असा पराभव स्वीकारावा लागला. संघर्षमय चाललेल्या या 80 मिनिटांच्या लढतीत अखेरीस बिंजिगाओने बाजी मारली. धडाक्यात प्रारंभ करताना सिंधूने पहिला गेम 21-15 असा जिंकला होता. पण, दुसऱया गेममध्ये बिंजिगाओने जोरदार पुनरागमन करताना हा गेम 14-21 असा जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱया व निर्णायक गेममध्ये उभयतांत एकेक गुणासाठी चुरस पहायला मिळाली. एकवेळ 10-10, 15-15 अशी बरोबरी होती. पण, बिंजिगाओने जोरदार स्मॅशेसच्या जोरावर 20-18 अशी आघाडी मिळवली. यानंतर, सिंधूने सलग दोन गुण मिळवताना 20-20 अशी बरोबरी साधली. मोक्याच्या क्षणी मात्र बिंजिगाओने आपला खेळ उंचावताना सलग गुणाची कमाई करताना गेम 24-22 असा जिंकत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आता उपांत्य फेरीत तिच्यासमोर जपानच्या अकाने यामागुचीचे आव्हान असेल.