|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सोनशी भागातील खनिज वाहतुकीत 25 टक्के कपात

सोनशी भागातील खनिज वाहतुकीत 25 टक्के कपात 

प्रतिनिधी /वाळपई :

सोनशी गावातील खनिज वाहतुकीसंबंधिच्या समस्येची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने खाण कंपन्यांना खनिज वाहतूक कमी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार शनिवारी सेसा गोवासह अन्य खाण कंपन्यांनी आपली वाहतूक कमी केली. जवळपास 250 ट्रकांची वाहतूक कमी केली होती. त्यामुळे सोनशी गाव बायपास करुन होणाऱया खनिज वाहतुकीचे प्रमाण कमी होणार आहे. त्यातच शनिवारी दिवसभर आयएलपीएल खनिज कंपनीची वाहतूक तांत्रिक कारणासाठी बंद ठेवण्यात आली होती.

दोन दिवसांपूर्वी सोनशीत खनिज वाहतुकीमुळे होणाऱया प्रदुषाणाच्या विरोधातील याचिकेवर महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने गावातील विविध समस्यांची जाणीव करुन घेतली. सहा कंपन्याच्या होणाऱया खनिज वाहतुकीमुळे प्रदूषण व इतर समस्या निर्माण होत असल्याने 25 टक्के खनिज मालाची वाहतूक करणारे ट्रक कमी करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर सध्या सोनशी गाव बायपास करुन ‘मराठा सडा’ भागातून होणारी वाहतूक त्याच मार्गाने सुरु ठेवावी व पुन्हा गावातून नेण्यात येऊ नये असा आदेश देण्यात आला आहे. याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सेसा गोवा खाण कंपनीने आपले 25 टक्के ट्रक कमी केले आहेत. तसेच इतर खाण कंपन्यांनी आपल्या वाहन संख्येत कपात केल्याने रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी झाल्याचे निर्देशनास आले आहे. मराठ सडा भागातून एकामोगोमाग येणारे ट्रक कही अंतर सोडून येताना दिसत होत्या.

मुंबई उच्च न्यायालय व सुप्रिम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहे. यावेळी खाण कंपन्यानी सोनशी ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याची हमी दिली आहे. प्रदूषणावरही नियंत्रण राखण्यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्टपणे नमूद करुन गोवा प्रदूषण महामंडळास ठिकठिकाणी धूळ प्रदूषण मोजमाप करणारी यंत्रणा कार्यान्वित करावी, असे स्पष्ट बजाविले आहे.

दरम्यान, पिसुर्ले येथे कार्यान्वित असलेली आयएलपीएल कंपनीची खनिज उत्खननाचे काम ठप्प झाले होते. यामुळे खनिज वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आले होते. त्यांनी खाण संचालनालय विभागाकडे यासंबंधी परवानगी मागितलेली आहे. मात्र काही कारणास्तव आज ती मिळू शकलेली नाही. सोमवारपर्यंत ही परवानगी मिळाल्यास वाहतूक पुन्हा सुरु होणार आहे.

Related posts: