|Monday, August 26, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » परशुरामाला वरदान

परशुरामाला वरदान 

परशुरामाने आपल्या आज्ञेप्रमाणे रेणुकेचे डोके उडवले हे पाहून जमदग्नी ऋषींना अत्यंत आनंद झाला. तेव्हा काय झाले याचे एकनाथ महाराज वर्णन करतात-

ऋषि गर्जे प्रसन्नता । मागसी तें देईन आता । रामे चरणी ठेविला माथा। विनंती स्वामिनाथा अवधारीं ।। माझी उठवावी हे माता । बंधूंची दवडावी निजप्रेतता। हेंचि मागतों गुरुनाथा। दिल्हे तत्वतां ऋषि म्हणे।।

तुझा लागतांचि हात।बंधू प्रेतत्वा होती निर्मुक्त । चेतनासुखें सावचित्त। यथास्थित वर्तती ।। रेणुकेची दुखंडे। तुझेनि हाते होती अखंडें । शांतिसुखाचेनि सुरवाडे। वाडेंकोडें उठतील ।।

प्रसन्न झालेले जमदग्नी ऋषि परशुरामाला म्हणाले, “तू मागशील ते तुला मी आता देईन.’’ त्यावर परशुरामाने त्यांना दंडवत घातला आणि त्याने आपले मागणे मागितले “माझी मृत झालेली माता व बंधू यांना पुन्हा जिवंत करावे. हीच माझी विनंती आहे.’’ त्यावर जमदग्नीनी त्याला आशीर्वाद देत म्हटले, “तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. तुझा हात लागताच, तुझे बंधू प्रेतत्वातून मुक्त होतील. त्यांचे चैतन्य पुन्हा जागृत होऊन ते जसे पूर्वी होते तसे सावध चित्त होतील आणि नेहमीप्रमाणे वागू लागतील. तुझा हात लागताच रेणूकेच्या देहाचे दोन तुकडे जोडले जातील. ती शांतीसुखात आनंदात उठून बसेल.’’

म्यां छेदिली निजमाता । हें नाठवो मातेच्या निजचित्ता ।ऐसी मज द्यावी वरदता। चरणी माथा ठेविला।।

परशुरामाने पुन्हा मागणी केली की माझ्या मातेचे मी तुकडे केले हे तिच्या मनाला आठवू नये, असा वर मला द्या. असे म्हणून त्याने जमदग्नीच्या पायावर डोके ठेवले.

तुझें नाठवे छेदिलेपण।अंगी घायाचे न सिदती वण। निदेपासून उठली आपण। तैसे लक्षण पावेल।।

जमदग्नी म्हणाले, “तू तिचे तुकडे केलेस हे तिला आठवणार नाही. तिच्या अंगावर जखमेची काही खूणही राहणार नाही. झोपेतून उठल्याप्रमाणे ती उठून बसेल.’’

त्यानंतर परशुरामाने स्पर्श करताच त्याची आई रेणुका आणि त्याचे पाचही मृत होऊन पडलेले भाऊ पुन्हा जिवंत झाले.

कुणी म्हणेल जमदग्नी ऋषिंच्या शापाने जिवंत व्यक्ती मृत होऊन पडतात आणि पुन्हा त्यांच्याच कृपेने मृत व्यक्ती जिवंत होतात हे मोठेच आश्चर्य मानायला हवे. पण यापेक्षा मोठे आश्चर्य याचे आहे की अशी विलक्षण सिद्धी ज्यांना प्राप्त आहे असे तपसंपन्न जमदग्नी ऋषि त्यांच्याच मनाच्या क्रोध या एका विकारावर विजय मिळवू शकत नाहीत! आपले मन किती बलवान आहे याचा हा सबळ पुरावाच नाही काय? हे मन म्हणजे काय, हेच मुळात कळणे मोठे अवघड! क्रोध हा काही मनाचा एकमेव विकार नाही. काम, लोभ, मोह, मत्सर वगैरे अनेक विकारांनी आपले मन भरून गेलेले असते. या प्रत्येक विकारावर नियंत्रण मिळवायचे तर त्यासाठी कोणती साधना, कोणते तप करावे लागेल हे भल्याभल्यांना उमगत नाही हेच खरे.