|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » उचलायन

उचलायन 

हक्काने उचलेगिरी करणाऱया प्रेमळ मित्रांवर मी उचलायन नावाचे महाकाव्य लिहिणार आहे. त्याचे नायकपद कोणाला द्यावे हा प्रश्न आहे. पण कदाचित माझा एखादा मित्र स्वतःच ते उचलून नेईल.

‘समानशीले व्यसनेषु सख्यं’ या न्यायाने माझे मित्रदेखील वाचनवेडे आहेत. आमचे आवडते लेखक देखील समान आहेत. त्यामुळे मित्रांची चाहूल लागली की मी टेबलवरची पुस्तके घाईघाईने लपवतो. नंतर ती लपवलेली पुस्तके माझी मलाच सापडत नाहीत. यावर एका मित्राने सुचवले- ‘पुस्तकं का लपवतोस? आम्ही उचलून नेऊ. तुला पुस्तकांची गरज पडेल तेव्हा तू आम्हाला शिव्या दे. पुस्तके लपवून स्वतःवर चरफडण्यापेक्षा मित्रांना शिव्या देणे अधिक चांगले…’ मला त्याचा युक्तिवाद पटला नाही. एकदा अशीच मी एक ऐतिहासिक कादंबरी उशीच्या खोळीत लपवली. तेव्हा रात्री झोपेत माझी मान अवघडली होती.

मग मी एक जालीम उपाय केला. सगळय़ा पुस्तकांना कव्हर्स घातली आणि कव्हरांवर पुस्तकांची खरी नावे न लिहिता अश्लील पुस्तकांची नावे लिहिली. पूर्वी म्हणे चावट लोक धार्मिक पोथीमध्ये चावट पुस्तके लपवून वाचायचे. माझी मात्र वाचनवेडय़ा मित्रांमुळे वेगळी तऱहा झालेली. चावट पुस्तकांच्या कव्हरमध्ये चांगली पुस्तके लपवून मी ती वाचत होतो. या युक्तीमुळे काही दिवस मित्रांच्या उचलेगिरीचा त्रास वाचला.

पण माझ्या वाढदिवसाच्या आधी काही दिवस माझा मित्र हरिदासला दुर्बुद्धी सुचली. मी घरी नसताना त्याने माझी काही पुस्तके उचलली. फुटपाथवर अश्लील पुस्तके विकणाऱया विपेत्याला विकली आणि त्या पैशातून दोन उत्तम कवितासंग्रह आणून मला वाढदिवसाला भेट दिले. विपेत्याने कव्हरवरची नावे बघून ती घेतली. पण आत विविध कवितासंग्रह होते. गिऱहाईकांनी ती पुस्तके घरी नेल्यावर उघडून पाहिली आणि ते चिडले. त्यांनी त्या विपेत्याला बदडले. विपेत्याने हरिदासला चोपला. बिचारा हरिदास.

आता मी नवीन युक्ती काढली आहे. घरातली सगळी पुस्तके एका वाचनालयाला भेट दिली आणि काही रक्कम भरून त्यांचे सदस्यत्व स्वीकारले. मी वाचनालयात जातो. पुस्तक घेतो आणि जवळपास कुठेतरी बागेत बसून वाचतो.  वाचून झाल्यावर वाचनालयात पुस्तके परत नेऊन देतो.

घरी मी टीव्हीवर विनोदी मराठी मालिका न हसता बघतो. त्यामुळे सगळय़ा मित्रांचा ससेमिरा संपला आहे.