|Saturday, October 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » लालबत्ती गुल करा

लालबत्ती गुल करा 

नरेंद्र मोदींनी पंतप्रधान होण्याआधी ‘अच्छे दिन’ हा शब्द रूढ केला आणि पंतप्रधान झाल्यावर ‘मन की बात’ गाजत आहे. पंतप्रधान काय बोलतात याकडे देशवासियांचे लक्ष असते. रविवारी सकाळी मन की बात साखळीतील त्यांचे 31 वे भाषण झाले. त्यामधे वाढते तापमान ते युवा पिढी आणि लाल दिवा ते कामगारदिन पर्यंत अनेक विषयावर त्यांनी मते मांडली. लाल दिवा डोक्यातून काढून टाका असे त्यांनी लोकांना सांगितले. खरेतर हे त्यांचे सांगणे त्यांच्या सहकाऱयांसाठीही होते. देशाच्या सर्वोच्च पदावरचा नेता देशहितासाठी आपणाशी संवाद साधतो, चर्चा करतो, आपली मते समजून घेतो आणि देशातील नागरिकांच्या चर्चेतून, संवादातून कार्यक्रम आखतो हे भारतीयांसाठी अनोखे आहे. आजूबाजूला आपण सहज चौकशी केली तर आपणास लक्षात येईल नागरिक मेलद्वारा किंवा आधुनिक संपर्क माध्यमातून सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना सतत काही सांगत असतात. सुचवत असतात. संपर्क क्रांतीतून हे शक्य झाले असले तरी जनसामान्यांना त्यांचे अप्रूप आहे. आजवर मन की बात कार्यक्रमात भ्रष्टाचार, शेती विकास, शेतकरी आत्महत्या, काळा पैसा यासह विविध विषयावर चर्चा झाली आणि नोटा बंदीपासून व्हीआयपी संस्कृतीपर्यंत अनेक विषयावर मंथन झाले. आजही पंतप्रधानांनी वाढते तापमान हा चिंतेचा विषय बनला असल्याचे अधोरेखित केले. वाढते तापमान आणि पिण्याच्या पाण्याची समस्या याबरोबरच वाढत्या तापमानामुळे अडचणीत आलेले पशू-पक्षी जीवन याकडे लक्ष वेधून मोदी यांनी पशू-पक्षी जीवन वाचवले पाहिजे. त्यासाठी सामुदायिक प्रयत्न हवेत असे सांगितले. कोणतीही चांगली, देशहिताची गोष्ट एखादी व्यक्ती अथवा केवळ सरकार करू शकत नाही तो जनसामान्यांचा, सर्वाचा कार्यक्रम बनला तर यशस्वी होतो. मोदी यांची खरी मन की बात ती आहे. योगा असो, ग्राऊंडवरील विद्यार्थ्यांचे खेळ असोत अथवा स्वच्छ भारत सारखी मोहीम असो सव्वाशे  कोटी लोक त्यात सहभागी हवेत. सर्वांची साथ व सर्वांचा विकास झाला पाहिजे यावर मोदींचा भर असतो. विशेष करून युवकांना बरोबर घेण्यात, त्यांना हितोपदेश करण्यात आणि देशभक्तीने भारून टाकून देशाच्या प्रगतीत-उन्नतीत त्यांना सहभागी करून घेण्यात मोदींची आघाडी असते. मन की बात मध्ये युवकांशी संवाद साधताना त्यांनी युवकांनी रोबोट सारखे बनू नये असे सांगितले. देश हिंडून बघा, देशाच्या विविधतेचा परिचय करुन घ्या, प्रत्येक गोष्टीत चौकटी बाहेरचा विचार करा, उन्हाळय़ाच्या सुट्टीत गरीब मुलांसोबत खेळा, प्रवास करा, अनुभव लिहा, नवीन भाषा शिका वगैरे सूचना केल्या. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती मुलांना, नातवंडांना उन्हाळी व दिवाळी सुट्टीत जे सांगते, सुचवते तेच मोदींनी सांगितले. पण, हे सांगणे देश म्हणून आवश्यक होते. देशाची विविधता आणि एकता यांचा केवळ पुस्तकी परिचय उपयोगी नाही. तुम्ही देशभर हिंडला. संपूर्ण देशाच्या संस्कृतीचा चालीरीतीचा अनुभव घेतला तर ऐक्य व एकता अधिक बळकट होईलच पण, पर्यटन व अन्य व्यवसायांना चालना मिळेल. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भारत हा विविधतेने नटलेला आणि जगाला गवसणी घालून जगात अव्वल होऊ पाहणारा देश आहे. ही त्यामागे भावना आहे आणि या भावनेशी जोडून देशातील सव्वाशे कोटी नागरिक एकत्रितपणे काही करतील अशी आशा ठेवून मोदी लोकांना विश्वासात घेत कार्यक्रम देत आहेत. आजवर देशात व्हीआयपी कल्चर होते. काही लोकांनी वेगळी वागणूक, विशेष वागणूक मिळत होती आणि त्यासंदर्भात लोकांच्या मनात संताप होता. मोदी यांनी लाल दिव्याची सुट्टी करुन व्हीआयपी संस्कृतीला तिलांजली दिली आहे. घटनेने सर्वांना समान मानले आहे. ओघानेच त्यांचा दर्जाही समान असला पाहिजे, ही त्यागाची भावना आहे. मोदींनी व्हीआयपी ऐवजी ईपीआय म्हटले आहे. ईपीआय म्हणजे एव्हरी पर्सन इज इंपॉरटंट (प्रत्येक माणूस महत्त्वाचा) लोकशाहीचे तेच खरे गमक आहे. प्रत्येकाला मताचा व सर्वांगीण विकासाचा अधिकार आहे. व्हीआयपी संस्कृतीची लालबत्ती गुल करताना मोदींना सर्वसामान्य हेच केंद्रबिंदू आहेत तेच देशाचे महत्त्वाचे घटक आहेत हे सुचित करायचे आहे. यापुढे कुणीही असो, कितीही मोठा असो लाल दिवा नाही आणि लाल दिवा मनातून, विचारातून काढून टाका असे सांगून भावी काळात सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू व महत्त्वाचा माणूस असेल हे मोदींनी केवळ बोलून नव्हे करून दाखवले आहे. लाल दिव्याची एक दहशत लोकांच्या मनात होती. ती या निमित्ताने दूर झाली. सगळे सारखे असतात पण, काही विशेष सारखे असतात असे म्हणत ठरावीक जण विशेष सवलती व अधिकार गाजवत असत. त्यांना यानिमित्ताने फटका बसायला सुरुवात झाली आहे. लोकांनी खऱया अर्थाने डोक्यातून लालबत्ती फेकून दिली की एक नवी संस्कृती सुस्थापित होईल. एक मे हा कामगार दिन आहे याचाही उल्लेख मोदींनी भाषणात केला. कामगारांना सन्मान व चांगले जीवन मिळाले पाहिजे यावर आपला भर आहे असे सांगताना त्यांनी  एक मे रोजी संत रामानुजाचार्यांचे तिकीट काढणार आणि सामाजिक एकता व संघटन बळकट करत संत रामानुजाचार्यांची जयंती साजरी करणार असे म्हटले. मोदी बोलतात त्याप्रमाणे काम सुरू होते हे दिसून आले आहे. त्यामुळेच देशात विविध भागात, निवडणूक असो, सभा असो अथवा नोटा बंदीसारखे विषय असोत नागरिक त्यांना व त्यांच्या कार्यक्रमांना प्रतिसाद देतात असे दिसून येत आहे. म्हणूनच नवा भारत उभा करायचा असेल तर तो सरकारी कार्यक्रम न होता जनतेचा कार्यक्रम झाला पाहिजे. नवा भारत, प्रगत भारत हे जनतेचे स्वप्न आहे. ते जनतेने साकारले पाहिजे. त्यासाठी मूठ बांधली पाहिजे. मोदींसारखा एक नेता सर्वांना बरोबर घेऊन देशाची प्रगती-उन्नती साधू पाहत आहे. सव्वाशे कोटी जनतेने या न्यू इंडिया योजनेचे स्वागत केले पाहिजे.