|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मालवण पालिकेचा यंदा शतक महोत्सव

मालवण पालिकेचा यंदा शतक महोत्सव 

उद्यापासून वर्षभर विविध उपक्रमांची रेलचेल

मनोज चव्हाण/ मालवण

मालवण नगरपालिकेची स्थापना होऊन येत्या 2 मे 2017 रोजी 99 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजेच यंदाचे वर्ष हे नगरपालिकेचे शतक महोत्सवी वर्ष असल्याने वर्षभर विविध कार्यक्रमांची आणि उपक्रमांची जोरदारपणे आखणी करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर रूपरेशा आखण्यासाठी सर्व नगरसेवकांची बैठक नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या उपस्थितीत नुकतीच घेण्यात आला.

शतक महोत्सवानिमित्त शहराला स्वच्छतेची नवी झळाळी प्राप्त करून देण्यासाठी नागरिकांच्या सहकार्यातून विविध स्वच्छता उपक्रम घेण्यात येणार आहेत. यात प्रभागनिहाय्य स्वच्छता स्पर्धा आणि त्याचबरोबर मालवण एक ब्रन्ड म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेशित करण्यासाठी व्यापक प्रसिद्धीचीही योजना आखण्यात आली आहे. मालवण शहराचे स्वत:चे घोषवाक्य, शहर पक्षी, शहर प्राणी, शहर वृक्ष आदींची निवड करण्यासाठी नागरिकांतून निवड प्रक्रियाही राबविण्यात येणार आहे.

शहराचा खेळ म्हणून आटय़ापाटय़ाचा खेळ प्रोजेक्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे समजते. जिल्हय़ातील सर्व नगरपालिका, नगरपंचायतीचे स्नेहसंमेलन व क्रीडा महोत्सव, नगराध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा, पाककला स्पर्धा, सर्व धर्मियांच्या सणांच्या अनुषंगाने गणेश सजावट स्पर्धा, गोठे सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहे.

मंगळवारी शतक महोत्सवास प्रारंभ

2 मे रोजी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध योजनांचे पाणी शुद्धीकरण
प्रकल्प, पिंपळपार आणि रॉक गार्डनमधील पर्यटन स्वच्छतागृह, पिंपळपार उद्यान, हायमास्ट टॉवर या उपक्रमांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. याचबरोबर शहरातील विविध कलावंतांच्या कलागुणांना वाव देणाऱया एकांकिका, नाटय़, गायन, चित्रकला, कथाकथन, वक्तृत्व, निबंध लेखन आदी स्पर्धांबरोबरच वैशिष्टय़पूर्ण अशी जिल्हास्तरीय भजनबारी स्पर्धा घेण्यात येणार आहे. नगरपालिकेच्यावतीने शतक महोत्सव साजरा करण्यासाठी सुमारे 10 लाख रुपयांची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे.

2 मे 2018 रोजी सांगता समारंभ

2 मे 2018 रोजी या शतक महोत्सवी वर्षाचा भव्य सांगता समारंभ होणार आहे. या सोहळय़ाला केंद्रातील अनेक मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री, कलावंत यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. वर्षभरातील भविष्यातील उपक्रमात स्विमिंग पूल, चिवला बीच जलक्रीडा केंद्र, मोरेश्वर पर्यटनदृष्टय़ा विकसित, स्मृतिवन, प्रवेशद्वार, खाऊगल्ली, होरारत्न म्हापणकर स्म़ृतीउद्यान, शिक्षणमहर्षी के. डी. गावकर, ज्योर्तिभास्कर जयंतराव साळगावकर, नटसम्राट मच्छिंद्र कांबळी, नेपथ्यकार रघुवीर तळाशिलकर, रंगकर्मी कमलाकर सारंग आणि अशा अनेक मालवणच्या दिग्गज सुपुत्रांना मानवंदना देणारे विविध कायमस्वरुपी उपक्रम यावर्षी सुरू करण्यात येणार आहेत.