|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जगाच्या पोशिद्यांला शाब्बासकीची थाप मिळणार केव्हा…?

जगाच्या पोशिद्यांला शाब्बासकीची थाप मिळणार केव्हा…? 

अमर वांगडे / सातारा

अन्नदाता सुखी भवः असे नुसतं म्हटलं जातं, पण जगाची भूक भागवणाऱया अन्नदात्याच्या समस्या काय आहेत हे पहायला कोणालाही वेळ नसतो. कुटुंबाचा चरितार्थ चालण्यासाठी राबराबणाऱया शेतकऱयाचा सन्मान होताना पहायला मिळत नाही. 1 मे रोजी कामगारांचा गौरव होतो मात्र अशा सत्कार समारंभापासून शेतकरी यापासून कोसो दूरच असतो. सत्कार सोडाच आता तर पिचलेला शेतकरी गळय़ात फास अडवण्याची तयारी करत आहे. कारण ही तसेच आहे पडलेले शेतीमालाचे दर. बळीराजा दररोज शेतीत राबतो मात्र कामगारदिनाला त्याचा गौरव होत नाही. अशा बळीराजाच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळणार काय? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे. 

 1 मे रोजी आपण सर्व ‘कामगार दिन’ व ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा करतो पण याच महाराष्ट्रातील शेतकरी आपला हक्क मिळवण्यासाठी झटत आहे. गेल्या 126 वर्षापासून आपण कामगार दिन साजरा करतो, औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला. परंतु त्यांची पिळवणूकही झाली. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास 12 ते 14 तास राबवून घेतले जात होते. या विरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांची निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ 8 तास काम असावे, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व 1891 पासून 1 मे हा कामगारदिन म्हणून साजरा केला जातो, असा इतिहास आहे. आज कामगार दिन. विकासात कामगारांच्या योगदान प्रोत्साहन देण्यासाठी 1 मे हा दिवस जगभरात कामगारदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी जगातील 80 देशांमध्ये सार्वजनिक सुटी देण्यात येते. कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतु सर्वांचा पोशिंदा असलेला शेतकरी हा 12 महिने 24 तास हा राबत असतो त्याला कोणत्याही प्रकारची कोणीही शाब्बासकीची थाप देत नाही. वरून शेतीमालाचे भाव पाडून त्याच्या कष्टावर पाणी टाकले जाते. 1 मे कामगार दिन हा सरकारी व खाजगी कंपनीतील कामगारांचा दिवस. शेतकरी हा 12 महिने राबतो काबाड कष्ट घेतो. शेतात राबणारा हा कामगार, कष्टकरी याचा सन्मान होत नाही. जिह्यातही आजही 80 टक्के शेती लोक करतात, शेतात राबतात. 20 टक्के लोक हे नजिकच्या कंपनीत, शासकीय कार्यालयात काम करतात. त्यांना मात्र कामगारदिनाचा कौतुक सोहळा अनुभवयाला आणि पहायला मिळतो. मात्र बळीराजाच्या पाठीवर कौतुकाची थाप केव्हा पडणार? असा प्रश्न आहे.