|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » देशी पर्यटकापेक्षा विदेशी पर्यटक खर्च करतात जास्त पैसा

देशी पर्यटकापेक्षा विदेशी पर्यटक खर्च करतात जास्त पैसा 

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यात येणारे विदेशी पर्यटक देशी पर्यटकाच्या मानाने तीन ते चारपट जास्त पैसे खर्च करतात. त्यामुळे राज्याच्या महसुलात भर घालण्यात विदेशी पर्यटकांचे जास्त योगदान असल्याचे स्पष्ट होत आहे. पर्यटन व्यवसाय हा विदेशी पर्यटकावर जास्त अवलंबून आहे. हॉटेल व्यवसायात तर विदेशी पर्यटकांचे योगदान मोठे आहे.

राज्यात दाखल होणाऱया पर्यटकांपैकी 11 टक्के पर्यटक हे विदेशी असतात, मात्र गोव्यात येऊन बरेच दिवस वास्तव्य करणारे विदेशी पर्यटक आपल्या वास्तव्य कालावधीत मोठय़ा प्रमाणात पैसे खर्च करतात. विदेशी पर्यटक सरासरी 87 हजार रुपये खर्च करतो तर देशी पर्यटक सरासरी 31500 रुपये खर्च करतो. हे प्रमाण पाहता विदेशी पर्यटक देशी पर्यटकाच्या मानाने जास्त पैसे खर्च करतात. गोव्यात देशी आणि विदेशी पर्यटकांचा ओघ वाढत चालला आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायाच्या दृष्टीने ही बाब दिलासादायक आहे.

 गोव्यात येणारे विदेशी पर्यटक दीर्घकाळ वास्तव्य करतात. त्यांचे हॉटेलातील वास्तव्यही दीर्घकाळ असते. त्यामुळे हॉटेल व्यवसायाच्या दृष्टीने विदेशी पर्यटकांची वाढती संख्या ही दिलासादायक आहे. देशी पर्यटकांचे हॉटेलामधील वास्तव्य हे कमी काळाचे असते. त्याचबरोबर कर्नाटक, महाराष्ट्र व केरळमधून येणारे पर्यटक हे स्वत:ची वाहने घेऊन येतात व किनारी भागात वास्तव्य करणे पसंत करतात. हॉटेलमध्ये वास्तव्य करण्याचे ते टाळतात. त्याचबरोबर जेवणही स्वत: बनवितात. त्यामुळे अशा पर्यटकांकडून हॉटेल व्यवसायाला फार मोठा फायदा मिळत नाही.

विदेशी पर्यटकामुळे टॅक्सी व्यवसायालाही फायदा होत आहे. हॉटेलमध्ये वास्तव्य करणारे विदेशी पर्यटक टॅक्सीमधून फिरणे पसंत करतात किंवा भाडय़ाने वाहने घेऊन स्वत: चालवितात. त्यामुळे टॅक्सी व भाडय़ाने दुचाकी, चारचाकी वाहने देणाऱयांनाही विदेशी पर्यटकापासून फायदा होतो. मुळात टॅक्सी व्यवसाय व भाडय़ाने वाहने देण्याचा व्यवसाय हा बऱयाच प्रमाणात पर्यटकावर अवलंबून आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये गोव्यात दाखल होणारे काही विदेशी पर्यटक फेब्रुवारी मार्चपर्यंत गोव्यात वास्तव्य करतात. काही विदेशी पर्यटक तर दीर्घकाळासाठी किनारी भागातील घरे भाडेपट्टीवर घेतात. त्यामुळे एकुणच विदेशी पर्यटक देशी पर्यटकापेक्षा गोव्यात जास्त पैसा खर्च करतात.

Related posts: