|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा शिपयार्डकडून मॉरिशस पोलीस दलाकडे गस्ती जहाज सुपूर्द

गोवा शिपयार्डकडून मॉरिशस पोलीस दलाकडे गस्ती जहाज सुपूर्द 

प्रतिनिधी/ वास्को

गोवा शिपयार्डने मॉरिशस तटरक्षक दलासाठी बांधलेले ‘सीजीएस वेलियांट’ जलद गस्ती जहाज रविवारी गोवा शिपयार्डमध्ये आयोजित केलेल्या सोहळय़ात गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निवृत्त रिअर ऍडमिरल शेखर मित्तल यांच्या हस्ते मॉरिशस पोलीस दलाचे उप आयुक्त के. जुगरू यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

या सोहळय़ाला मॉरिशसचे अधिकारी कमांडर कॅप्टन सौरव ठाकूर, कमांडिंग ऑफिसर ओ. के. गुनेस, गोवा शिपयार्डचे वरिष्ठ अधिकारी व कामगार वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.

गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निवृत रियर ऍडमिरल शेखर मित्तल यांनी या जहाजासंबंधी यावेळी बोलताना 17 मे 2014 रोजी करार झाल्याचे सांगून 22 मे 2015 रोजी जहाजाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. 2 फेब्रुवारी 2017 रोजी इला मित्तल यांच्याहस्ते जहाजाचे जलावतरण करण्यात आले होते. गोवा शिपयार्डमध्ये बांधलेल्या मॉरिशस तटरक्षक दलाच्या जहाजाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आल्याचे सांगून सर्वसंबंधीतांना या यशस्वी कामगारीचे श्रेय दिले. त्यांनी यावेळी मॉरिशस सरकार, संरक्षण मंत्रालय, राज्य सरकारचेही सकारात्मक सहकार्य मिळत असल्याचे सांगून सर्वांचे आभार व्यक्त केले.

 गोवा शिपयार्डमधील मॉरिशस जहाजाच्या सोहळय़ात मॉरिशसच्या पोलिस दलाचे उप आयुक्त के. जुगरू यांनी गोवा शिपयार्डच्या कार्याचे कौतुक केले. गोवा शिपयार्डने बांधलेले हे जहाज मॉरिशस दलात सामील झाले आहे. या जहाजाचा समुद्रातील गस्ती, चाचेगिरी, तस्करीविरोधी, शोध व बचाव मोहिमेसाठी आदी कार्यासाठी वापर होणार आहे. या जहाजावर 30 एमएमच्या सीआरएन 91 गन, 12.7 एमएम एचएमजीएस व 7.62 एमएमच्या एमएमजीएस तसेच या जहाजाला तासी 27.3 सागरी मैल पार करण्याची क्षमता आहे.