|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इराणकडून कच्च्या तेलाच्या आयातीत कपात करणार भारत

इराणकडून कच्च्या तेलाच्या आयातीत कपात करणार भारत 

नैसर्गिक वायू क्षेत्राच्या विकासावरून वाद

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इराणकडून भारताने मागील वर्षी ज्याप्रमाणात कच्चे तेल खरेदी केले होते, त्यात यावर्षी एक चतुर्थांश कपात करण्याची योजना आहे. नवी दिल्ली आणि तेहरान दरम्यान एका नैसर्गिक वायू क्षेत्राला विकसित करण्यावरून वाद झाला आहे. यामुळे भारत इराणकडून खरेदी केल्या जाणाऱया कच्च्या तेलात कपातीची योजना तयार आखत आहे.

इराणच्या फरजाद बी नैसर्गिक वायू क्षेत्रावरून दोन्ही देशांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. जर भारतीय कंपन्यांच्या समूहाला या क्षेत्राच्या विकासाचा अधिकार मिळाला नाही तर भारतीय तेल कंपन्यांना इराणकडून होणाऱया खरेदीत कपात करण्यास सांगितले जाईल.

या कपातीनंतर इराणकडून भारतात आयात होणाऱया तेलाचे प्रमाण यावर्षी 3,70,000 बॅरल प्रतिदिन असेल. चीननंतर भारतच इराणचा सर्वात मोठा तेलग्राहक आहे. मागील वर्षी इराणकडून 5,10,000 बॅरल प्रतिदिन या हिशेबाने कच्च्या तेलाची आयात झाली होती. इराणकडून आयात होणाऱया कच्च्या तेलात 2017-18 मध्ये जी कपात केली जाईल, त्यात तेल कंपन्यांद्वारे मागविले जाणारे 1,99,000 बॅरल प्रतिदिन कच्चे तेल देखील सामील आहे. खासगी तेलशुद्धीकरण कंपन्या एस्सार आणि एचपीसीएल-मित्तल एनर्जी लिमिटेडने मागील वर्षाच्या कंत्राटाचे नुतनीकरण  केले आहे.

इराणकडून तेल आयातीत कपात करण्यामागचे मुख्य कारण नैसर्गिक वायू क्षेत्र नाही. सरकार बेंट आणि दुबई क्रूडच्या मूल्याचे लाभ घेऊ इच्छिते. बेंट कूड स्वस्त पडत असल्याने ते खरेदी करणे फायद्याचा व्यवहार असल्याचे तज्ञांनी सांगितले.