|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » यजमान विंडीजला वर्चस्वाची संधी

यजमान विंडीजला वर्चस्वाची संधी 

अजहर अलीचे शानदार शतक, गॅब्रियलचे 4 बळी, दुसऱया डावात विंडीजची सावध सुरुवात

वृत्तसंस्था / ब्रिजटाऊन

येथे सुरु असलेल्या पाकिस्तानविरुद्ध दुसऱया कसोटीच्या तिसऱया दिवशी यजमान विंडीज संघाने दिवसअखेर 14 षटकांत 1 बाद 40 धावा केल्या. विंडीज संघ अजून 41 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 9 गडी खेळायचे बाकी आहेत. पाकिस्तानचा पहिला डाव 393 धावांवर संपुष्टात आला.

तत्पूर्वी, पाकिस्तानने 3 बाद 172 धावसंख्येवरुन तिसऱया दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. अझहर अलीने शतकी खेळी साकारताना 278 चेंडूत 9 चौकारासह 105 धावा फटकावल्या. कर्णधार मिसबाह मात्र शतकापासून वंचित राहिला. त्याला होल्डरने बाद केले. मिसबाहने 201 चेंडूत 9 चौकार व 2 षटकारासह 99 धावांची खेळी साकारली. या जोडीने चौथ्या गडय़ासाठी 98 धावांची भागीदारी साकारताना संघाला अडीचशेपर्यंत मजल मारुन दिली. ही जोडी बाद झाल्यानंतर असद शफीक (15), सर्फराज अहमद (9), शादाब खान (16), मोहम्मद अमीर (10) झटपट बाद झाले. यानंतर, यासीर शाहने 31 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारासह 24 धावांचे योगदान दिले. यासीर बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा पहिला डाव 140 षटकांत 393 धावांवर संपुष्टात आला. पाकला नाममात्र 81 धावांची आघाडी मिळाली. विंडीजतर्फे ग्रॅब्रियलने 4 तर देवेंद्र बिशू व जेसॉन होल्डर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.

दुसऱया डावात खेळताना यजमान विंडीज संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवर केरॉन पॉवेल 6 धावा काढून बाद झाला. यानंतर, कार्लोस ब्रेथवेट व हेतमार यांनी दिवसअखेर आणखी पडझड होवू दिली नाही. तिसऱया दिवशीचा खेळ थांबला तेव्हा विंडीजने 14 षटकांत 1 बाद 40 धावा केल्या होत्या. अजून ते 41 धावांनी पिछाडीवर आहेत. दिवसअखेर कार्लोस ब्रेथवेट (8) व हेतमार (22) धावांवर खेळत होते. सामन्याचे अजून दोन दिवस बाकी आहेत.

संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडिज पहिला डाव 312 व दुसरा डाव 14 षटकांत 1 बाद 40 (कार्लोस ब्रेथवेट खेळत आहे 1 चौकारासह 8, केरॉन पॉवेल 6, हेतमार खेळत आहे 4 चौकारासह 22, मोहम्मद अब्बास 1/14), पाकिस्तान पहिला डाव 140 षटकांत सर्वबाद 393 (अजहर अली 105, अहमद शेहजाद 70, मिसबाह उल हक 99, असद शफीक 15, यासीर शाह 24, गॅब्रियल 4/81, जेसॉन होल्डर 3/42, देवेंद्र बिशू 3/116).