|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दक्षिण रत्नागिरीत पावसाच्या हलक्या सरी

दक्षिण रत्नागिरीत पावसाच्या हलक्या सरी 

प्रतिनिधी / रत्नागिरी

रत्नागिरीत गेले काही दिवस उष्णतेची लाट असताना बुधवारी रात्री पावसाच्या हलक्या सरी चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी लांजा, राजापुर शहर व परिसरातील भागात पडल्या. राज्यभरात मंगळवारपासून विविध ठिकाणी पाऊस व गारांचा जोरदार शिडकावा झाला. मात्र रत्नागिरीत पावसाने हजेरी लावली नव्हती. गेले काही दिवस दक्षिण रत्नागिरी पावसाचे ढग आकाशात गर्दी करत आहेत. मात्र पावसाचा शिडकावा झाला नव्हता. हवामान खात्यानेही यंदा मान्सून लवकर येत असल्याचा अंदाज बांधला आहे. त्यानुसार पावसाच्या हजेरीची संकेत प्राप्त होऊ लागले आहेत.

बुधवारी रत्नागिरी शहर तसेच मिरजोळे, कळझोंडी धरण परिसरात आदी ठिकाणी पावसाचा चांगलाच शिडकावा झाला. पावसानंतर गुरूवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. पावसाच्या शिडकाव्याने उष्णतेचा पारा मात्र कमी झालेला नाही. तसेच पावसाच्या हलक्या सरी झाल्याने आंबा पिकाचेही नुकसान झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र काजू पिकावर याचा परिणाम होऊ शकतो. गुरूवारी झालेल्या हलक्या पावसाच्या सरींवरून मे महिन्याच्या मध्यावर पाऊस पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

लांजा तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी

लांजा तालुक्यात सायंकाळी बुधवारी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याने साऱयांची धावपळ उडाली. दिवसभर गर्मीने हैरान झालेल्यांना पावसामुळे गारवा मिळाला. बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. तर दुपार नंतर कडक उन पडले होते. त्यानंत्तर सायंकाळी 4 वा नंत्तर ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडण्याची दाट अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी 6.30 वाजता लांजा शहरासह तालुक्याच्या पूर्व भागातही पावसाच्या सरी कोसळल्या.

राजापुरात पावसाचा शिडकावा

बुधवारी संध्याकाळच्या वेळेत राजापूर तालुक्याच्या काही ग्रामीण भागात हलकासा पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात काही काळासाठी गारवा निर्माण झाल्याने उन्हाच्या झळा सहन करणाऱयांना काहीसा दिलासा मिळाला. अचानक आलेल्या पावसामुळे साऱयांचीच धांदल उडाली. पाच-दहा मिनिटांनी पाऊस गेला तरी वातावरणात बऱयापैकी गारवा निर्माण करून गेला होता. त्यामुळे प्रचंड उष्म्याने हैराण झालेल्यांना तेवढाच दिलासा मिळाला. मात्र दुसऱया दिवशी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पुन्हा एकदा गर्मीचा सामना करावा लागला.

संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पाऊस

संगमेश्वर तालुक्यातील बुधवारी रात्री विजेच्या गर्जनेसह अवकाळीचे आगमन झाले. सायंकाळी पासूनच पावसाळी वातारवण तयार झाले होते. रात्री महावितरणची विज गायब झाल्याने नागरिक हैराण झाले होते. गुरुवारीही पावसाळी वातावरण तयार केले होते. परंतु सायंकाळपर्यंत पाऊस आला नव्हता.

चिपळुणात पावसाची रिमझिम

गेल्या दोन दिवसांपासून शहरासह परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यामुळे बागायतदार धास्तावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून उष्म्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून येथे ढगाळ वातावरण होते. असे असतानाच बुधवारी सायंकाळी शहरात पावसाचा शिडकावा झाला, तर खेर्डी व मिरजोळी भागात चांगलाच पाऊस पडला. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. मात्र काहीवेळाने पुन्हा उष्म्यात वाढ झाली. त्यानंतर गुरूवारी सायंकाळीही ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यानंतर काहीवेळातच पावसाचा शिडकावा झाला.

या अवेळी पावसामुळे बागायतदार धास्तावले असून मोठा पाऊस पडल्यास मोठय़ाप्रमाणात आंब्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या अवेळी पावसामुळे रस्त्यावर व्यवसाय थाटलेल्यांची एकच तारांबळ उडाली.

Related posts: