|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्ग जिल्हय़ात घरपट्टी वसुली 18.81 कोटींवर

सिंधुदुर्ग जिल्हय़ात घरपट्टी वसुली 18.81 कोटींवर 

प्रतिनिधी/ सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 429 ग्रामपंचायतींनी सन 2016-17 या वर्षात 18 कोटी 81 लाख 53 हजार रुपयांची घरपट्टी वसूल केली आहे. एकूण 90 टक्के वसुली झाली असून सर्वाधिक देवगड तालुक्याने 101 टक्के वसुली केली आहे. तर 6 कोटी 17 लाख 66 हजार रुपयांची पाणीपट्टी वसूल केली आहे. हे प्रमाण 103 टक्के आहे. सावंतवाडी तालुक्याने सर्वाधिक 113 टक्के पाणीपट्टी वसूल केली आहे.

घरपट्टीची वसुली यापूर्वी चौरसफुटावर केली जात होती. परंतु गतवर्षापासून मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणी सुरू झाल्याने काहींनी त्याला विरोध करत घरपट्टी भरली नव्हती. त्यामुळे 2015-16 या वर्षात 5 कोटी 43 लाख 45 हजार रुपये एवढी घरपट्टी थकित झाली होती. मात्र, 2016-17 या वर्षात त्या पैकी 4 कोटी 93 लाख 8 हजार रुपये एवढी घरपट्टी वसुली झाली आहे. 2016-2017 या वर्षात 15 कोटी 35 लाख 65 हजार रुपये एवढी घरपट्टी वसूल होणे अपेक्षित होते. त्यापैकी 13 कोटी 88 लाख 45 हजार रुपये एवढी 90 टक्के वसुली झाली आहे.

2015-16 या वर्षातील थकित घरपट्टी आणि 2016-17 या वर्षातील घरपट्टी मिळून एकूण 20 कोटी 79 लाख 1 हजार रुपये घरपट्टी वसूल होणे अपेक्षित होते. पैकी 18 कोटी 81 लाख 53 हजार रुपये एवढी घरपट्टी वसूल झाली आहे