|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सत्तेतून बाहेर पडा नंतरच मोहीम राबवा

सत्तेतून बाहेर पडा नंतरच मोहीम राबवा 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे शिवसेनेला आवाहन

सरकार विरोधातील आंदोलनाचे स्वागत करू

मुंबई / प्रतिनिधी

राज्यातील शेतकऱयांची खरोखर काळजी असेल तर शिवसेनेने आधी सरकारमधून बाहेर पडावे आणि नंतरच शिवसंपर्क अभियान सुरू करावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केले.

शिवसेनेने शेतकऱयांशी संवाद साधण्यासाठी शिवसंपर्क मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आज ‘टिळक भवन’ या काँग्रेस मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी शिवसेनेच्या निर्णयावर टीका केली. शेतकऱयांच्या दुरवस्थेला भाजप इतकीच शिवसेनाही जबाबदार आहे. सत्तेत आल्यावर सातबारा कोरा करू असे आश्वासन शिवसेनेने दिले होते. शिवसेना सत्तेत सहभागी होऊन अडीच वर्ष झाली तरी सातबारा कोरा का केला नाही? असा सवाल चव्हाण यांनी केला.

शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी आहेत. त्यांनी शेतकऱयांचे प्रश्न सोडवावेत. ते सोडवणे त्यांना जमत नसेल तर त्यांनी अगोदर सरकारमधून बाहेर पडावे आणि मग आंदोलन करावे. विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून सत्ताधारी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कर्जमाफीसाठी सरकारकडून केली जाणारी टाळाटाळ आणि तूर खरेदीबाबत फसलेले व्यवस्थापन यामुळे शेतकऱयांमध्ये सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे, असे चव्हाण म्हणाले.

राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे तूर उत्पादक शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱयाला वाऱयावर सोडून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हे परदेश दौऱयावर गेले आहेत. तर कृषि खात्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सरकार विरोधात मोर्चा काढण्याची भाषा करत आहेत. सरकारच्या विरोधात मंत्री आंदोलन करत आहेत अशी दुर्दैवी परिस्थिती राज्याच्या इतिहासात कधी आली नव्हती, असे चव्हाण यांनी सांगितले.

‘शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शेतकऱयांची काळजी असेल तर त्यांनी आपल्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत आणि मगच संपर्क अभियान राबवून सरकार विरोधात आंदोलन करावे. त्यांच्या आंदोलनाचे आम्ही स्वागत करू.’

अशोक चव्हाण

Related posts: