|Sunday, November 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » ‘नॉटी बॉय’ झेपावले, ‘जीसॅट-9’ स्थिरावले

‘नॉटी बॉय’ झेपावले, ‘जीसॅट-9’ स्थिरावले 

दक्षिण आशियाई उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण :   इस्त्रोच्या ‘जीएसएलव्ही एफ-09’ प्रक्षेपकाच्या मदतीने उड्डाण

श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था

जीसॅट-9 अर्थात दक्षिण आशियाई उपग्रहाचे शुक्रवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्त्रो) यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून इस्त्रोच्या जीएसएलव्ही एफ-09 या प्रक्षेपकाच्या मदतीने जीसॅट-09 या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. या उपग्रहामुळे संदेशवहन सेवेचे जाळे अधिक घट्ट होणार असून त्याच्या निर्मितीसाठी 235 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. तसेच या मोहिमेसाठीचा एकूण खर्च 450 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे.

दक्षिण आशियातील सात देश ‘जीसॅट-9’ उपक्रमाचा भाग आहेत. यामध्ये भारतासह श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि मालदीवचा समावेश आहे. या उपक्रमात पाकिस्तानला समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही. आपल्याकडे स्वतंत्र अंतराळ कार्यक्रम असल्याची भूमिका पाकिस्तानने घेतल्यामुळे त्यांना या उपक्रमात स्थान देण्यात आलेले नाही. मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर इस्त्रोकडून सार्क उपग्रह विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हा उपग्रह भारताकडून शेजारच्या देशांना भेट दिला जाऊ शकेल असा त्यांचा विचार होता.

जीसॅट-9 या उपग्रहाच्या मोहिमेचा कालावधी 12 वर्षांचा असणार आहे. उपग्रहाचे वजन 2,230 किलो आहे. या उपग्रहामुळे संदेशवहनाचे जाळे अधिक व्यापक आणि विस्तारित करता येणार आहे. दक्षिण आशियाई देशांमधील संपर्क व्यवस्था एका वेगळय़ा उंचीवर नेण्यात जीसॅट-9 मोलाची भूमिका बजावणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कार्यातही या उपग्रहाची मदत होऊ शकणार आहे. या उपग्रहामुळे आशियाई देशांना डीटीएच आणि काही विशिष्ट व्हीसॅट क्षमता उपलब्ध होऊ शकणार आहेत. याशिवाय संकटकाळात एकमेकांना माहितीचे आदानप्रदान करणेही सहजसोपे होणार आहे, असे इस्त्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले.

‘नॉटी बॉय’च्या मदतीने उड्डाण

आतापर्यंत जीएसएलव्ही प्रक्षेपकाची दहापैकी पाच उड्डाणे अयशस्वी ठरल्याने जीएसएलव्हीला ‘नॉटी बॉय’ असे नकारात्मक संबोधन मिळाले होते. मात्र भारतासह सार्क देशांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या ‘जीसॅट-9’ या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे जीएसएलव्हीविषयीची नकारात्मक भूमिका बदलेल अशी आशा भारताला आहे. या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताच्या आशा आणि अपेक्षा उंचावल्या आहेत.

सर्व राष्ट्रप्रमुखांनी पाहिले थेट प्रक्षेपण

जीसॅट-9 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व देशांच्या प्रमुखांनी एकाचवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पाहिले. तसेच राष्ट्रप्रमुखांनी एकमेकांशी संवादही साधला. या यशस्वी प्रक्षेपणाचा सोहळा आपणा सर्वांसाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. आपणा सर्वांच्या प्रोत्साहन आणि सहकार्यामुळे हे प्रक्षेपण यशस्वी झाले असून हा आनंदाचा क्षण नेहमीच आशियाई देशांच्या स्मृतीत राहील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच इतर आशियाई राष्ट्रांनी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी सर्व राष्ट्रप्रमुखांचे अभिनंदन केले.

‘जीसॅट-9’ उपग्रहाची वैशिष्टय़े…

‘जीसॅट-9’ उपग्रहाच्या मोहिमेचा कालावधी 12 वर्षांचा

उपग्रह निर्मितीसाठी तब्बल 235 कोटी रुपयांचा खर्च

जीएसएलव्ही एफ-09 प्रक्षेपकाच्या मदतीने प्रक्षेपण

दक्षिण आशियातील सात देश ‘जीसॅट-9’ उपक्रमाचा भाग

उपग्रहामुळे संदेशवहन सेवेचे जाळे अधिक घट्ट होणार

संपर्कव्यवस्थेतही ‘जीसॅट-9’ मोलाची भूमिका बजावणार

आपत्ती व्यवस्थापन कार्यातही या उपग्रहाची मदत होणार

आशियाई देशांना डीटीएच आणि व्हीसॅट क्षमता मिळणार

 

हा ऐतिहासिक क्षण….

जीसॅट-9 उपग्रहाचे प्रक्षेपण हा आपणा सर्वांसाठी ऐतिहासिक क्षण आहे. अशाप्रकारच्या यशस्वी उड्डाणांमुळे सहकार्याच्या कक्षा अधिक रुंदावतील. यशस्वी प्रक्षेपणाबद्दल मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Related posts: